मुंबई : चंद्रपूर महापालिका महापौर निवडीत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देऊन भाजपचा महापौर निवडून आणल्याची सल काँग्रेस नेत्यांमध्ये कायम आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही खंत बोलून दाखवताना काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या राजकीय घडामोडींविषयीच्या समितीची बैठक टिळकभवन येथे पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रपूर विषयीच्या प्रश्नावर रमेश चेन्निथला यांनी ठाकरे गटाविषयीची खंत बोलून दाखवली.
चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी मविआचा घटक पक्ष शिवसेनेने (ठाकरे) काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी चर्चा झाली होती, पण त्यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिला, पण काँग्रेस पक्षाने मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परभणीत शिवसेनेला (ठाकरे) पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, सर्वांशी चर्चा झाली होती. काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही, असा टोला लगावताना त्यांनी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मविआ व इंडिया आघाडीची स्थापना झालेली असल्याची आठवण करून दिली.
राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीने प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. प्रचंड प्रमाणात पैसा वापरला, हा पैसा आला कुठून, असा प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची हत्या केली असे चेन्नीथला म्हणाले. विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दडपशाहीला न भिता निर्धाराने लढले व चांगले यश मिळवले. भाजपा सरकार घोटाळेबाज असून राज्यात गुंतवणूक येत नाही, ती शेजारच्या गुजरात राज्यात जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ते राजकारण करण्यात व अतंर्गत वादातच गुंतले असल्याचे सपकाळ म्हणाले. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले आदी उपस्थित होते.
पक्ष बांधणीवर भर
काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत.
बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे चेन्नीथला म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काँग्रेस पक्षाशी कोणीही संपर्क साधलेला नाही. जेव्हा तशी विचारणा होईल तेव्हा पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
