मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार उभा केल्याबद्दल काँग्रेसची अधोगती सुरू झाला असल्याची टीका राष्ट्रवादीचे (अजित पवार) खासदार पार्थ पवार यांनी केली. याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या आणि महाशक्तीसमोर शरणागत झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरे राहील, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसकडून देण्यात आला.

पार्थ पवार यांच्या टीकेला काँग्रेसने आज एक्स या माध्यमातून उत्तर दिले. धड भाषणही न देता येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या अधोगतीबद्दल बोलणे म्हणजे जरा जास्तच झाले. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे.

कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा निवडणुकीतून माघार घेईन, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे लोका सांगे ब्रह्मज्ञान – हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले जात आहे. यालाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. विधानसभेची पोटनिवडणूक जनभावना लक्षात घेऊन बिनविरोध व्हायला हवी, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, अशी टीका त्यांनी केली.

जी जनभावना आहे त्याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत. बारामतीत अजित पवार यांचा झालेला विमान अपघात हा अपघात होता की घातपात याचे शंका निरसन व्हावे ही महाराष्ट्राची खरी जनभावना आहे.

विमान अपघात प्रश्नी एफआयआर दाखल करून ताबडतोब चौकशी करण्याचे कर्तव्य फडणवीस यांना करता आले असते, पण त्यांनी ते केले नाही. त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास व्हावा ही खरी जनभावना आहे, असे सपकाळ म्हणाले.