"दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि...", पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर | Congress Sachin Sawant criticize Raj Thackeray mentioning Jaysingrao Pawar | Loksatta

X

“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख करत राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
सचिन सावंत व राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवारांचा संदर्भ देत इतिहासावर भाष्य केलं. तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे प्रतापराव गुजर यांच्याबरोबर सहा लोक नव्हते. त्याचा कोणताही पुरावा जगातील इतिहासात नाही, असं मत व्यक्त केलं. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख करत राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत यावर आपली भूमिका मांडली.

सचिन सावंत म्हणाले, “थोर इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निष्कर्ष वापरणे ही आपली चूक होती असे कबूल केले होते. डॉ जयसिंगराव पवार यांच्या भेटीनंतर काही प्रकाश पडेल अशी अपेक्षा करुया का?”

“नंतरच्या काळात ते आपली चूक प्रांजळपणे मान्य करतात”

सचिन सावंत यांनी ट्वीट केलेल्या फोटोत म्हटलं आहे, “डॉ. पवार सुरुवातीच्या काळात इतिहासाच्या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके लिहीत असत. अशा सुरुवातीच्या काळातील पुस्तकात त्यांनी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे लिहिले. त्यानंतरच्या काळात ते आपली चूक प्रांजळपणे मान्य करतात.”

“संशोधनाअंती त्यांनी चूक दुरुस्त केली”

“या पाठ्यपुस्तकासाठी संदर्भग्रंथ म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक वापरले होते. त्यामुळे ही चूक झाली आणि ती त्यांच्या नावावर पडली. पुढे डॉ. पवार स्वतंत्रपणे संशोधनाकडे वळले आणि नवनवे साधने शोधू लागले. तेव्हा संशोधनाअंती त्यांना आपली चूक उमजली. ती त्यांनी दुरुस्त केली,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

“दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते”

“दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हे त्यांनी सप्रमाण मांडले. हे मांडताना ते प्रांजळपणे आपली आधीची चूकही मान्य करतात आणि नवे संशोधन ठामपणे मांडतात. ते मांडल्यामुळे त्यांच्यावर जातीयवादाचे आरोप झाले. परंतु, त्यांनी त्याची फिकीर केली नाही,” असंही सावंत यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:01 IST
Next Story
“काळ बदललाय, सगळंच तुमच्या…”, राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर!