जालना – संघटनात्मक पुनर्रचनेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. कांही निलंबित पक्ष सदस्यांनी बैठकीत घुसून पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तणाव वाढल्यामुळे बैठकीच्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. गुजरातमधून आलेल्या पक्ष निरीक्षकांसमोरच हा प्रकार घडला.

शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीस गुजरातमधून आलेले पक्ष निरीक्षक तसेच अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य हेमंत पटेल, खासदार डॉ. कल्याण काळे आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपस्थित होते.
पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा नंदा पवार, महानगरपालिकेचे नगरसेवक फारूक तुंडीवाले आणि सय्यद रहीम बैठकीत दाखल झाले आणि नेत्यांना जाब विचारला.

पक्षविरोधी कारवायांचा आरोप आणि त्यावरून करण्यात आलेल्या निलंबनाबाबत त्यांनी नेत्यांना स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर बैठकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि नंदा पवार यांच्यात जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की बूट फेकण्याचा प्रयत्न आणि शिवीगाळही झाल्याचे बैठकीस उपस्थित असणाऱ्या कांहींनी सांगितले.

तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने कांही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून करून दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती निवळण्यास मदत झाली.बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही बोलवण्यात आले. गुजरातहून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आलेले हेमंत पटेल यांच्यासमोर पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आले.

सात नगरसेवकांचे निलंबन

जालना महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नऊपैकी सात नगरसेवकांचे पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल निलंबन करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी या सात सदस्यंनी भाजपच्या पराभूत उमेदवारास पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नंदा पवार आणि अब्दुल रशीद पहैलवान यांनाही निलंबित करण्यात आलेले आहे.

पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका

तत्पूर्वी वार्ताहर बैठकीत बोलताना पटेल यांनी सांगितले की ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे जालना येथील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला.

‘बूट वादावर जिल्हाध्यक्ष काय म्हणाले ?

बैठकीत बूट काढून अंगावर फेकल्याचा आरोप नंदा पवार यांनी यावेळी केला. त्यावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी या आरोपाचा इन्कार केला असून असे कांही झाले नसल्याचे म्हटले आहे.