नांदेड: संवैधानिक मूल्यांची जोपासना करून सर्वसमावेशक संघटन बांधणीचे ध्येय ठेवून अखिल भारतीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संघटनेचे पुर्ननिर्माण केले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व आघाड्यांच्या प्रमुख नेते व पदाधिकार्यांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षांसह तालुकाध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती अ.भा.काँग्रेसचे सचिव वेणुगोपाल राव यांनी येथील वार्ताहर बैठकीत दिली.
येथील नक्षत्र बँक्वेट हॉलमध्ये गुरुवारी पक्षाच्या संघटन सृजन अभियानाचा प्रारंभ झाला. त्यानंतर आयोजित वार्ताहर बैठकीत वेणुगोपाल राव यांनी या अभियानाचा उद्देश व अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. अ.भा.काँग्रेसचे सचिव रवींद्र दळवी, खासदार रवींद्र चव्हाण, पक्ष निरीक्षक अशोक पाटील निलंगेकर, अमर खानापुरे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
वेणुगोपाल राव म्हणाले, या अभियानांतर्गत पुढील १२ दिवस नांदेड जिल्ह्यात आमचा मुक्काम राहणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दौरा करून पक्षाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख, महत्त्वाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार आहे. भविष्यात पक्षाचे परिपक्व संघटन निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. या दौर्यात सर्वांचे विचार, त्यांच्या तक्रारी, विद्यमान कार्यकारिणीतील त्रूटी जाणून घेतल्या जातील. आजपर्यंत ज्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही, त्यांना या अभियानाच्या माध्यमातून संधी मिळणार आहे.ॉ
१० एप्रिल रोजी नांदेड उत्तर आणि उत्तर ग्रामीणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा होणार असून ११ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण व ग्रामीणचा दौरा होईल. १२ एप्रिल रोजी कंधार, लोहा आणि मुखेड मतदारसंघ, १३ एप्रिल रोजी नायगाव मतदारसंघाचा दौरा होणार आहे. १७ एप्रिल रोजी किनवट आणि माहूर मतदारसंघ, १८ एप्रिल रोजी भोकर मतदारसंघ, १९ एप्रिल रोजी ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या नाहीत, त्यांच्यासाठी वेळ दिला जाणार आहे आणि २० एप्रिल रोजी देगलूर-बिलोली मतदारसंघाचा दौरा केला जाणार असल्याचेही वेणुगोपाल राव यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी इच्छुकांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या दौर्यात झालेली चर्चा, अनुभव, पात्रता आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा विचार करून पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अहवाल पाठविला जाणार आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत १० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती रवींद्र दळवी यांनी यावेळी दिली.
