कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग; सतेज पाटील घेणार फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची भेट; म्हणाले, “अण्णांचं राहिलेलं स्वप्न…”

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आखाडा रंगत चालला आहे

Congress, Satej Patil, BJP, Devendra Fadanvis, Chandrakant Patil for By Election, Election in Kolhapur, Kolhaur By Election
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आखाडा रंगत चालला आहे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आखाडा रंगत चालला आहे. काँग्रेस पक्षाकडे हा मतदारसंघ असल्याने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. याचवेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने दंड थोपटले आहेत. भाजपाने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रस्ताव फेटाळत जयश्री जाधव यांनाच उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली असतानाच पक्षातील अर्धा डझन इच्छुकांनी कंबर कसली आहे. आप सह अन्य उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी आहे.

दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली असून असून शिवसेना, राष्ट्रवादी तसंच भाजपा नेत्यांशी चर्चा करणार आहेत. “आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामं मंजूर झाली होती. दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले आहेत. पण आज त्या सगळ्या कामांचं उद्घाटन आपण करत आहोत. त्यांनी शहरासाठी दिलेलं योगदान आणि या भावनेतून सगळी उद्घाटनं काँग्रेसच्या वतीने करत आहोत. अण्णांवर प्रेम केलं तसंच हे शहर जयश्री वहिनींवर प्रेम करेल आण आशीर्वाद देईल अशी अपेक्षा आहे,” असं सतेज पाटील यांनी सांगितलं.

कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची चाचपणी

“महाविकासआघाडी म्हणून पोटनिवडणुका झाल्या तिथे आम्ही एकत्रितपणे लढलो आहोत. काँग्रेसची जागा असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून पाठिंबा देतील अशी आशा आहे. भाजपाचे चंद्रकांत पाटील, फडणवीस यांनाही भेटणार असून अण्णांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी विनंती करणार आहे. कोल्हापूरची सर्वांना एकत्र नेण्याची, पुरोगामी विचारांची संस्कृती असून त्यांचं सहकार्य मिळालं तर चांगल्या पद्दतीने वहिनी पुढील काम करतील,” अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असून शिवसेना, राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार आहे. यावेळी त्यांना एकत्र येण्यासाठी विनंती केली जाईल,” असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार उद्योगपती चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रामुख्याने उद्योजकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान शेवटच्या टप्प्यात निवडणूक होईल असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress satej patil to meet bjp devendra fadanvis chandrakant patil for by election in kolhapur sgy

Next Story
Wardha Car Accident: भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी