राज्यात १९७२ पेक्षाही मोठा दुष्काळ पडला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची तात्काळ घोषणा करावी अन्यथा, काँग्रेस सभागृहात आणि रस्त्यावर जोरदार आंदोलन करून सरकारला जेरीस आणेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला.
विदर्भ आणि मराठवाडय़ात मोठा दुष्काळ आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन आणि धान पीक गेले. अल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा पेऱ्याचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन जाळला आणि काहींनी तर जनावरांना खाऊ घातला. एकेकाळी कापसाचे भाव प्रती क्विंटल सात हजार रुपयांपर्यंत गेले होते. गेल्या वर्षी साडेपाच हजार रुपये प्रती क्विंटल होते. यावर्षी व्यापाऱ्यांनी भाव पाडून कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. सरकारने कापसाला प्रती क्विंटल साडेसहा हजार रुपये भाव द्यावा. कोकणात अतिवृष्टीमुळे, तर विदर्भात पावसाअभावी धान पीक गेल्याची माहिती  सरकारकडे आली आहे, परंतु सरकारने त्यासंदर्भात अद्याप पॅकेज जाहीर केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी उगीच दौरे कुरून दुष्काळी स्थिती पाहणीचा फार्स न करता जिरायती शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रती हेक्टर आणि बागायतदारांना ५० हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहीर करावी, असेही ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत पॅकेज म्हणून जाहीर करावी म्हणून आणि जवखेड येथील दलित कुटुंबाच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे संयोजक माजी मंत्री नितीन राऊत आणि काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार आहेत. यासंदर्भातील कार्यक्रम ठाकरे यांनी जाहीर केला. संपूर्ण राज्यात तालुक्याच्या ठिकाणी १ डिसेंबरला धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबरला रास्तारोको आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल सभागृहात अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्या विरुध्द हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असेही ते म्हणाले.

जवखेड हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडय़ातील एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाली यावेळी राज्यात राष्ट्रपती शासन होते, पण राज्यपालांनी त्या गावाला भेट दिली. त्यानंतर सत्तारूढ झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र तिकडे गेले नाही की, त्या कुटुंबीयांबद्दल त्यांनी संवेदनाही व्यक्त केली नाही. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, असेही ठाकरे म्हणाले.

निलंबित आमदारांची बैठक
निलंबित झालेल्या आमदारांची आज नागपुरात बैठक बोलाविण्यात आली होती. आमदार राहुल बोंद्रे, अमर काळे, अब्दुल सत्तार, वीरेंद्र जगताप उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे कौटुंबिक कारणामुळे येऊ शकले नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार बैठकीला होते. सुमारे दोन तास ही बैठक सुरू होती.