गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांनी एका सभेत म्हणून दाखवलेल्या कवितेवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. या कवितेतून शरद पवारांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा दावा करत महाराष्ट्र भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांचा या सभेतील व्हिडीओ ट्वीट करत टीका केली होती. यावरून गुरुवारी दिवसभर दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. याच वादावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देखील संदर्भ देत भाजपाच्या भूमिकेवर टीका केली आहे.

काय होतं ट्वीटमध्ये?

भाजपाने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये शरद पवार आपल्या भाषणात जवाहर राठोड यांची एक कविता म्हणून दाखवत असताना दिसत आहेत. “मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ब्रह्मा-विष्णू-महेश आम्ही आमच्या छन्नीनं बनवले. हा तुमचा देव बनवल्यामुळे तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचं काव्य जवाहर यांनी लिहून ठेवलं होतं”, असं शरद पवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

“माझं म्हणणं एवढंच आहे की या प्रकारची बाजूला ठेवण्याची भूमिका पाळणारा वर्ग आजही समाजात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने धर्म आणि काही रीतीरिवाज या नावाखाली लोकांच्या मनात जातीयवादाचं, धर्मवादाचं विष पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिढ्यान् पिढ्या एकत्र राहणाऱ्या कष्टकरी लोकांमध्ये अंतर वाढवण्याचा प्रयत्न हा वर्ग करतोय. अशा प्रयत्नांविरुद्ध संघर्ष करणं आणि त्यासाठी एकत्र राहाणं ही जबाबदारी तुमची-माझी आहे”, असं देखील या व्हिडीओमध्ये पवार बोलताना दिसत आहेत.

“संतांनीही देवी-देवतांना दूषणे दिली”

दरम्यान, भाजपाच्या या ट्वीटवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “देवी देवतांना दूषणे संतांनीही दिली. तुकाराम म्हणाले- माझ्या लेखी देव मेला! जनाबाई म्हणाल्या-अरे विठ्या विठ्या। मूळ मायेच्या कारट्या! उभी राहूनी अंगणीं। शिव्या देत दासी जनी! भक्तीतून ईश्वरनिंदेचाही अधिकार मिळतो हे विठ्ठलाचे तेज काढण्याच्या विचारांच्या तुम्हा मनुवाद्यांना कळणार नाही”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

“ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता…”, भाजपाच्या टीकेनंतर शरद पवारांचं प्रत्युत्तर, पुन्हा ‘ती’ कविता वाचत म्हणाले…

“तुम्हाला हिंदूत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बरं! तुमच्या समविचाऱ्यांकडून गांधीहत्या करण्याचे ७ वेळा प्रयत्न झाले ते अस्पृश्यता निवारण व मंदिर प्रवेश कार्यक्रम हाती घेतल्यानंतर. तुम्ही बाबासाहेबांना सोडले नाही. मग पाथरवट कवितेतील शोषिताचा त्रागा काय कळणार?” असा सवाल देखील सचिन सावंत यांनी भाजपाला टॅग करून विचारला आहे.