राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेबद्दल भाष्य करताना थोरात यांनी पूर्वीचे राज ठाकरे वेगळे होते आता वेगळेच राज ठाकरे पहायला मिळत असल्याचं थोरात म्हणाले आहेत. संगमनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी राज यांच्यावर निशाणा साधलाय.

राज ठाकरेंच्या सभांबद्दल थोरात यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, “राज ठाकरे बोलण्यात हुशार आहेत. मात्र ती सभा आम्हाला राज ठाकरेंची वाटली नाही. आम्हाला ती भाजपाची वाटली,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना थोरात यांनी राज ठाकरेंच्या आधीच्या सभांचा संदर्भ दिला. “आम्ही पूर्वीच्या राज ठाकरेंच्या सभा ऐकल्यात आणि लोकांनीही ऐकल्यात. त्याच्यात फार मोठा बदल आम्हाला दिसतोय. ते जे ओरिजन म्हणजेच खरेखुरे राज ठाकरे झाकोळले गेलेले आहेत,” असं थोरात म्हणाले.

“आता कोणाच्या तरी सांगण्याने विचार मांडणारे राज ठाकरे पुढे आलेले दिसत आहेत. खरे राज ठाकरे आम्ही पूर्वी पाहिले. हे सध्याचे राज हे खरे राज ठाकरे नाहीत,” असा टोलाही थोरात यांनी लगावला. मागील दोन सभांमध्ये राज ठाकरेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर सडकून टीका केलीय.

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्यानिमित्त आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. याच आठवड्यामध्ये झालेल्या ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांबरोबरच जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.