विधानसभा विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. या चाचणीनंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाषण केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर जोरदार टोलबाजी केली. पण, या टोलेबाजीमध्येही त्यांनी नेत्यांना खळखळून हसवले. मात्र, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत नेमकं मुख्यमंत्री कोण असा खोचक टोला लगावला आहे.

नेमके काय घडले होते पत्रकार परिषदेत?
विधानसभेचे दोन दिवसीय विषेश अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेना संतोष बंगार कोणत्या पक्षातून तुमच्याकडून आले असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला शिंदे उत्तर देणार तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदें समोरचा माईक काढून घेतला आणि स्वत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, की ते खऱ्या शिवसेनेतून आले आहेत. आत्तापर्यंत ते चुकीच्या गटात होते. मात्र, फडणवीसांनी अचानक समोरचा माईक काढून घेल्यामुळे एकनाथ शिंदे गोंधळलेले पहायला मिळाले.

उद्धव ठाकरेंकडूनही टोला.
या घटनेवरून सरकारमध्ये नेमकं कोणाचं वर्चवस्व आहे हे दिसतयं अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेना टोला लगावला आहे. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासमोरचा माईक खेचला. पुढे काय काय खेचतील माहिती नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.