संवाद साधताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय बळीराजा म्हणावं, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्वीट केलं आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, असा आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका होत आहे. त्यातच आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणण्याचा आग्रह काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध – मुनगंटीवार

‘वंदे मातरम’ आमचा स्वाभिमान आहे. तर बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावं, अशी सूचना नाना पटोलेंनी केली आहे. ‘वंदे मातरम’ म्हणण्याला आपला विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, अशी प्रतिक्रिया हॅलोऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा खोचक सवालही त्यांनी मुनगंटीवारांना केला आहे. ‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर तुरुंगात टाकणार का? अशी विचारणाही आव्हाड यांनी केली आहे.

‘वंदे मातरम्’वरुन नव्या वादाला सुरुवात; मुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध

दरम्यान, आव्हाडांच्या या टीकेला सुधीर मुनगटींवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शब्दांचा योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करू शकलो नाही, हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष असल्याचं सांगत मुनगंटीवारांनी आव्हाडांना टोला लगावला आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करून तुरुंगात टाकू, असं म्हटलं नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याला विरोध म्हणजे संविधानालाच विरोध करण्यासारखे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, या आदेशाला रझा अकादमीने विरोध दर्शवला आहे. ‘वंदे मातरम्’ ऐवजी दुसरा शब्द द्यावा, अशी मागणी अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी केली आहे. याबाबत मौलाना आणि संबंधितांशी चर्चा करून राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचे नूरी यांनी सांगितले. ‘वंदे मातरम’ हा शब्द उच्चारण्यावरून अनेकदा वाद झाले होते. भाजपा खासदार आणि एमआयएममध्ये या शब्दावरून संसदेत अनेकदा खडाजंगी झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president asks workers to say jai baliraja instead of vande mataram rvs
First published on: 16-08-2022 at 13:37 IST