राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं गेल्या काही दिवसांत प्रकर्षाने समोर आलं आहे. गोंदिया चंद्रपूर जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हणत नाना पटोलेंनी खळबळ उडलून दिली होती. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाल्याची टीका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीर काँग्रेसकडून देखील या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं असून आता सत्ताधारी पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

“ठिगळ तरी कुठे लावायचं?”

सामना अग्रलेखातून काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना टीका करण्यात आली आहे. “काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“…तर हे दुर्दैव आहे”

दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या टीकेला काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचा गाळपाचा हंगाम सुरू झालेला आहे. गाळप कधी करतात, हे काही लोकांना माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे. १३७ वर्ष देशाच्या मातीत काँग्रेस पक्षानं असेच काढलेले नाहीत. ज्याची-त्याची विचार करण्याची क्षमता आणि शक्ती असते. त्यांच्या विचारातून त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे लक्षात येतं. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे काँग्रेस अधिक दृढ आणि सशक्त होईल हे आम्ही पाहू”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

नाना पटोलेंचीही टीका

दरम्यान, शिवसेनेच्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यावरून निशाणा साधला आहे. “आम्ही सोनिया गांधींसमोर ही भूमिका मांडूच. पण इतर कुणाशी बोलण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही आमची भूमिका जनतेसमोर मांडू. ते त्यांच्या पेपरमध्ये त्यांची भूमिका मांडतील. त्यांना स्वायत्तता आहे. ही स्वायत्तताही राजीव गांधींमुळेच मिळाली आहे. राजीव गांधींनी मीडियाला स्वायत्त करण्याचा निर्णय घटनादुरुस्तीने केला”, असं नाना पटोले म्हणाले.

“किमान समान कार्यक्रमातील शेतकऱ्यांचं कर्ज सोनिया गांधींच्या विचाराने माफ झालं. एससी, एसटी, अल्पसंख्य या वर्गाला न्याय मिळण्याची भूमिका सोनिया गांधींनी मांडली. ती अजून पूर्ण होत नाहीये. सातत्याने आम्ही ती भूमिका मांडतोय. जनतेचे प्रश्न मांडतोय. विकासनिधीचं समान वाटप व्हावं, एका पक्षाला जास्त आणि दुसऱ्याला कमी हे बरोबर नाही. ही टीका नाही. सरकार जेव्हा झालं, तेव्हा जे बोलणं तिन्ही पक्षांमध्ये झालं, ते पूर्ण व्हावं ही भूमिका काँग्रेस मांडतेय”, असं देखील नाना पटोले म्हणाले.