मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात लाखो शेतकऱ्यांना विविध अटी आणि शर्तींच्या जाळ्यात अडकवून योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
या बाबत समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या संदेशात वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे, आता कर्जमाफीचा आधार दाखवत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावण्याचा सरकारचा डाव आहे. एका हाताने मदत देऊन दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे काढून घेण्याची ही फसवणुकीची नीती आहे, अशी जोरदार टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकारचा प्रसिद्धीचा स्टंट
शेतकरी कल्याणासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते; परंतु कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धी आणि जाहिरातींवर तब्बल १० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र अद्याप अपेक्षित मदत पोहोचली नसताना शासन केवळ प्रसिद्धीचा स्टंट करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
