पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी यश

पहिल्या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण २६८ जागा होत्या. पण काही मतदारसंघांत द्विसदस्यीय किंवा त्रिसदस्यीय प्रतिनिधी होते.

(संग्रहित छायाचित्र)

वेध विधानसभेचा

स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक पार पडली. तेव्हा महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हते. बॉम्बे प्रांत हे तेव्हा राज्य होते. विदर्भ आणि मराठवाडा हा भाग मुंबई राज्यात समाविष्ट नव्हता. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, गुजरात आणि कर्नाटकचा भाग मिळून मुंबई राज्य होते.

पहिल्या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण २६८ जागा होत्या. पण काही मतदारसंघांत द्विसदस्यीय किंवा त्रिसदस्यीय प्रतिनिधी होते. म्हणजेच काही मतदारसंघांतून तीन अथवा दोन सदस्य निवडून आले होते. निवडून येणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या तेव्हा ३१५ होती. यापैकी काँग्रेसच्या २६९ जागा निवडून आल्या होत्या. काँग्रेसला मुंबई प्रांतात एकतर्फी असे यश मिळाले होते. सध्या रायगड आणि राज्याच्या एक-दोन जिल्ह्य़ांपुरताच सीमित राहिलेल्या शेकापला काँग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे १४ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष १८ निवडून आले होते.

मुंबई प्रांताचे १९४६ ते १९५२ या काळात बाळासाहेब खेर हे पहिले मुख्यमंत्री होते. १९५२ ते १९५६ या काळात मोरारजी देसाई यांनी मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. देसाई यांच्या काळातच संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला होता. यात १०५ हुतात्मे झाले.

मुंबई राज्याच्या पहिल्या निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेले यश

एकूण जागा – २६८ (काही मतदारसंघ द्विसदस्यीय वा त्रिसदस्यीय प्रतिनिधी)

निवडून आलेले एकूण सदस्य – ३१५

निवडून आलेले काही सदस्य आणि त्यांचे मतदारसंघ

अलिबाग – दत्तात्रय कुंटे, ठाणे – माधव हेगडे, बोरिवली – माधव देशपांडे, धुळे – सुखदेव मोरे आणि सोनुजी वानखेडकर, नाशिक, इगतपुरी- भीका पवार, पांडुरंग मुरकुटे आणि दत्तात्रय काळे, अहमदनगर – विठ्ठल कुटे, पुणे शहरातील विविध मतदारसंघ – मालती शिरोळे, पोपटलाल शहा, रामचंद्र घोरपडे, विनायक साठे, इंदापूर- शंकरराव पाटील (माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काका), माळशिरस – शंकरराव मोहिते-पाटील, कराड उत्तर – यशवंतराव चव्हाण, कराड दक्षिण – यशवंतराव मोहिते, सांगली – वसंतदादा पाटील, फलटण – मालोजीराजे नाईक निंबाळकर (विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे आजोबा ), रत्नागिरी – सीताराम सुर्वे, कुलाबा मुंबई – नथालाल मेहता, बोरिबंदर – कैलास नरोला, दादर -त्र्यंबक नरवणे,

काँग्रेस – २६९

शेकाप – १४

अपक्ष – १८

सोशालिस्ट पार्टी – ९

भारतीय कम्युनिस्ट पार्टी – १

शेडय़ूल कास्ट फेडरेशन – १

कामगार किसान पक्ष – २

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congresss one sided achievement in the first assembly elections abn