पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचे पत्र मिळाल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या असून भाजपाचे हे नवे सहानुभूती कार्ड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केला आहे. रविवारी पुण्यात पक्षाच्या १९व्या वर्धापनदिनी आणि हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कथीत धमकीच्या पत्राच्या खरेपणावरही शंका असल्याचे पवार यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्यावरील छाप्यादरम्यान हे धमकीचे पत्र सापडल्याचे दावा पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भाजपावर टीका केली आहे.

पवार म्हणाले, काही पुरोगामी लोकांनी एकत्र येऊन पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. यांच्यापैकी काही जणांना नक्षलवादी ठरवून सरकारने त्यांना अटक केली. सर्वांना माहिती आहे की, कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागे कोणाचा हात आहे. मात्र, ज्यांच्या या हिंसाचारात सहभाग नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या कृतीलाच सत्तेचा दुरुपयोग असे म्हणतात.

भाजपाला आता जाणीव झाली आहे की, ते लोकांचे समर्थन गमावत आहेत. त्यामुळेच त्यांनी सहानुभूतीसाठी धमकीच्या पत्राचा खेळ मांडला. मात्र, लोक या असल्या भूलथापांना बळी पडणार नाहीत याची मला खात्री आहे. या पत्राच्या खरेपणावरच आपल्याला शंका आहे. कारण, सीआयडीच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी मी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितले की, जेव्हा अशा प्रकारची धमकीची पत्रे येतात तेव्हा त्याची वाच्यता माध्यमांमध्ये केली जात नाही. तर सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती दिली जाते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ट्विट्सच्या माध्यमातून पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याबाबत पोलिसांनी उघड केलेल्या माहितीवर शरद पवार शंका उपस्थित करीत आहेत, ही खूपच दुर्देवी बाब आहे. मोदी हे देशाचे नेते आहेत, ते केवळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. पोलिसांकडे सर्व पुरावे असताना पवारांकडून इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणे अपेक्षित नव्हते.