गृहनिर्माण प्रकल्पांना फटका बसणार
अमरावती : करोना संकटकाळातील र्निबध आता शिथिल झाले असले, तरी साहित्याच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्रासमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोबतच आता पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बांधकामांचे दर पूर्वीच्या तुलनेत तब्बल १५ टक्कय़ांनी वाढले आहेत. याचा परिणाम यापूर्वी नोंदणी झालेल्या सदनिकांच्या दरावर झालेला नाही. त्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, उभारणी खर्च वाढल्याने शहरात आगामी काळात नव्याने तयार होणारी घरे, सदनिका, बंगल्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांवर उपचारासाठी प्राणवायूची मागणी वाढली. त्यामुळे सरकारने औद्योगिक क्षेत्राकडील प्राणवायू देखील वैद्यकीय कामासाठी वळवला. परिणामी स्टील, सिमेंट उद्योग व फेब्रिकेशन क्षेत्राला मोठा फटका बसला. आता स्टील आणि सिमेंटचे दर वाढले. दुसरीकडे डिझेल व पेट्रोलची दरवाढ झाल्याने वाहतूक खर्च आणि वाळू, खडी, मुरुम, डबर, विटांचे दर वाढले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बांधकामाचा खर्च किमान १५ टक्के वाढला आहे. यापूर्वीच बिल्डर्सकडे घरांची बुकिंग करणाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण, खर्च वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांना नफ्यावर पाणी सोडावे लागेल. तसेच आगामी काळात शहरात नवीन घरे, सदनिका, बंगल्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. टाळेबंदीच्या काळात काम बंद होते. दैनंदिन खर्च मात्र सुरुच होता. पूर्वीच्या दरांप्रमाणे ग्राहकांसोबत व्यवहार झाला होता. आता दर वाढल्याने खर्च वाढून आमच्या नफ्यावरच पाणी फेरले गेले. टाळेबंदीमुळे बांधकामाला विलंब झाल्याने ग्राहकांना नाराजी दर्शवली, असे बांधकाम कंत्राटदारांचे म्हणणे आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. यामुळे प्रामुख्याने स्टील व सिमेंटच्या दरात वाढ झाली. वर्षभरात सिमेंटची गोणी १०० रुपयांची वाढल्याने बांधकामाचे दरही वाढले.
र्निबध शिथिल झाल्यानंतर हे दर कमी होतील, असा अंदाज होता. मात्र, तूर्त दर कमी झाले नाहीत. यामुळे भविष्यात बांधकामाचे दर पुन्हा वाढू शकतात. असे सिमेंट व्यापाऱ्यांनी सांगितले. बांधकामाचे दर वाढले, पण घरांच्या किमती वाढल्या नाहीत. प्रामुख्याने सिमेंट व स्टील या दोन घटकांवर शासनाने नियंत्रण ठेवल्यास वाढलेले दर आटोक्यात येऊ शकतात. कोविडच्या काळात बांधकाम व्यवसाय आधीच मंदीत आहे. या व्यवसायाला चालना देणे अपेक्षित असताना होणारी दरवाढ चिंतनीय आहे. असे बांधकाम व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात बांधकामांना गती मिळते. बांधकाम व्यवसायासाठी हा सुगीचा काळ असतो. मात्र, सलग दोन वर्षे उन्हाळ्यातच बहुतांश बांधकामे बंद राहिली. यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली. आता बांधकामे खुली असली तरी साहित्याचे दर वाढले आहेत.