सांगली : मंगळवारच्या दमदार पावसानंतर बुधवारीही सांगलीत दुपारनंतर पावसाचा जोर होता. पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून सततच्या पावसाने सांगली, मिरजेतील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे, तर ग्रामीण भागात पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.
काल सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपासून पावसाची रिपरिप थांबली. मात्र, दुपारी तीन वाजल्यापासून पुन्हा पावसाचे आगमन झाले असून सायंकाळपर्यंत पावसाच्या थांबून थांबून सरी कोसळत होत्या. सांगलीतील राजवाडा चौक, स्टेशन रोड, सिटी पोस्ट आदी परिसरात पावसाने रस्त्यावर पाणी साचले असून शामरावनगर परिसरात सलग पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे.
सांगलीतील मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बसस्थानक परिसर, शिवाजी स्टेडियम, स्टेशन चौक, सिव्हील चौक, चैत्र बन परिसर, आनंदनगर, टिंबर एरिया, विजयनगर आणि मिरज शहरातील छ. शिवाजी महाराज स्टेडियम, मंगल चित्रपट गृह, अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर, वंटमुरे कॉर्नर आदी पाणी साचणाऱ्या भागाची आयुक्त सत्यम गांधी यांनी पाहणी केली. शहरातील महत्त्वाच्या भागात साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन रस्ते रहदारी योग्य होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता जलनिस्सारण चिदानंद कुरणे, शहर अभियंता त्रतुराज यादव, आपत्ती व्यवस्थापन सहायक आयुक्त नकुल जकाते उपस्थित होते.
दरम्यान ग्रामीण भागातही पावसाने आपली हजेरी कायम ठेवली असून आणखी काही काळ पाऊस सुरूच राहिला तर माळरानाला नीर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. किमान आठ दिवस रानात पाय टाकता येणार नाही, अशी स्थिती काळ्या मातीच्या शेतांची झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.