जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने कहर केला आहे. मागील ५ दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास हमखास हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसादरम्यान विजांचा कडकडाट, तसेच गारपिटीच्या तडाख्याने उस्मानाबाद, कळंब व लोहारा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे किलगड, ज्वारी, द्राक्षबाग, आंब्यासह जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान केले.
जिल्ह्यात मागील ५ दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. उस्मानाबाद शहर व परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी गारांचीही वृष्टी झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब पडले. पिकांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याने बळीराजावर पुन्हा संकट कोसळले. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास पावसासह गारांचा वर्षांव झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात रचून ठेवलेला कडबा, ज्वारीचे मोठे नुकसान झाले.
वाशी तालुक्यातील मांडवा व परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारांसह पडलेल्या पावसाने शेतातील कांदा, ज्वारी, गहू ही पिके जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी काढून ठेवलेली ज्वारी पावसाने भिजल्याने कणसे, तसेच कडबा काळा पडला. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचे ढीग साचले. वादळी वाऱ्यामुळे अंकुश दिगंबर रणदिवे यांच्या शेतात असलेल्या गुऱ्हाळावरील कोपट उडून गेल्याने गुळाच्या ढेपी पावसात भिजून जवळपास २० हजाराचे नुकसान झाले. आत्माराम रणदिवे यांच्या शेतातील एकरभर कांदापीक उद्ध्वस्त झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जनावरांचे कोठे, घरांचे पत्रे उडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामध्ये रणदिवे यांच्या शेतातील रोहित्राचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
लोहारा शहरासह तालुक्यातील नागूर, उंडरगाव, आरणी, मार्डी, मोघा, खेड, माकणी, सास्तूर, धानुरी, हिप्परगा (स.), बेंडकाळ, नागराळ या भागात रात्री मुसळधार पाऊस झाला. जवळपास १५ मिनिटे गारांचा वर्षांव झाला. नागूर येथील शेतकरी दिनकर जावळे पाटील यांची ४ एकर किलगडाची बाग उद्ध्वस्त झाली. आंबाबागांचेही मोठे नुकसान झाले.