भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर खालच्या पातळीवरची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून मौन धारण करण्यात आलं असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका केली आहे.

शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असताना रुपाली पाटील म्हणाल्या की, “गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत. अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल. ते सतत शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर तोंडसुख घेत असतात. भाजपा नेते स्वत:ला सुसंस्कृत समजतात पण त्याच लोकांच्या या भावना आहेत. केवळ ते बोलू शकत नाहीत, म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात,” अशा बोचऱ्या शब्दांत रुपाली पाटील यांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, “गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे असल्याने भाजपाने त्यांना आमदार बनवलं आहे. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी ते शरद पवारांवर नेहमी टीका करत असतात. भाजपाने महादेव जाणकरांचा देखील उपयोग करून घेतला, तेही पडळकरांप्रमाणे शरद पवारांवर टीका करत होते. पण ते वेळीच शहाणे झाले आणि त्यातून बाहेर पडले. पण भाजपाला सतत शरद पवारांना लक्ष्य करायचं असतं.”

“पवारांवर सतत शंका निर्माण करणे, प्रश्न उपस्थित करणे, राजकारणाची पातळी खालच्या दर्जाला आणणे, त्यासाठी भाजपाकडून गोपीचंद पडळकरांचा वापर केला जात आहे.” असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपाच्या माजी प्रवक्त्यावर नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या कारवाईचं कौतुक देखील केलं आहे.