नांदेड  – एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु होती. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्तव्यावर होते. याच दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१७) सायंकाळी ६ च्या सुमारास धनेगाव परिसरातील आयडियल सोसायटीत घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना माहिती दिली. अफजल पठाण असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> Video : रायगडमध्ये बसला दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

अफजल पठाण हा आपल्या कुटुंबीयांसोबत धनेगाव परिसरातील आयडियल सोसायटी येथे राहतो. विमानतळ पोलीस ठाण्यात तो हेड कॉन्सस्टेबलपदी कार्यरत आहेत. पत्नी नाजीम बेगमसोबत त्याचे नेहमी छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असायचे. अफजल पठाण मंगळवारी सायंकाळी ड्युटी करून घरी गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः जवळील सर्व्हिस रिव्हॅाल्वरमधून पत्नीवर गोळी झाडली. या घटनेनंतर नाजीम बेगमचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>> रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील मोबाईल शॉपीत चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या चौघांना मुद्देमालासह अटक

गोळीचा आवाज एकूण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान पत्नीवर गोळी झाडल्यानंतर आरोपी अफजल पठाण हा ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी ठाण्यातील पोलिसांना देखील धक्काच बसला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी अफजल पठाण हा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी देखील माहिती आहे. त्यांना दोन मुलं असून दोघेही शिक्षणासाठी बाहेर गावी आहेत. किरकोळ वादातून पत्नीचा गोळी झाडून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.