Premium

मक्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण

महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठय़ा क्षेत्रावर घेतले जात आहे.

price of corn fall at the global level
मक्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण (संग्रहित छायाचित्र)

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगामाचा मका बाजारात दाखल होत असतानाच दरामध्ये घसरण झाली आहे. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मक्याचे बंपर पीक आल्याचे एक आणि जून-जुलैदरम्यान, ब्राझिल व अन्य दक्षिण अमेरिकन प्रदेशातून होणारी आवक, असे दुसरे कारण आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया पोर्टसाठी जून महिन्याचा माल पुरवठय़ाचे मार्च व एप्रिलमध्ये झालेले करार २५५ ते २६५ डॉलरने (साधारण २१७० रु. क्विंटल) केलेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी हेच दर २९० ते ३०० डॉलपर्यंत होते. आता पुढील जुलै-ऑगस्टसाठी होणाऱ्या करारानुसार मक्याचे दर २४० ते २५० डॉलरने होत आहेत.

निर्यातक्षम मक्याला मुंबई पोर्टमध्ये दोन हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. गतवर्षी हाच दर २४०० ते २५०० रुपयांपर्यंतचा होता. महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठय़ा क्षेत्रावर घेतले जात आहे. मका उत्पादनात महाराष्ट्राचा पूर्वी दुसरा व तिसरा क्रमांक होता. आता चौथे ते पाचवे स्थान आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील सहयोगी संचालक (संशोधन) एस. बी. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात २०२०-२१ मध्ये सरासरी ११ लाख हेक्टर क्षेत्रातून ३९.७ मेट्रिक टन उत्पादन झाले, तर २०२१-२२ ला ३०.३४ मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते.

औरंगाबाद ही मक्याची मोठी बाजारपेठ असून येथून माल मुंबईला निर्यात करण्यासह देशभरातील स्टार्च कंपन्या, कुक्कुट पालन कंपन्यांना पुरवठा केला जातो. या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना मिळून एकूण उत्पादनापैकी ५० ते ६० टक्के मालाचा पुरवठा होतो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये स्टार्च कंपन्यांना मालाचा पुरवठा होतो. एका स्टार्च कंपनीला ३०० ते एक हजार टन मका दररोज लागतो. औरंगाबादेतील बाजारपेठेत हंगामात दररोज ५० हजार ते ७५ हजार क्विंटलने मक्याची आवक होत असते. मागील आठ दिवसात आवकही घटली असून औरंगाबाद जालना जिल्हा मिळून पाच ते दहा हजार पोत्यांची आवक होत आहे. पाचशे ते सातशे टन माल मुंबईला जात आहे. यावर्षी जळगाव, धुळे, अंमळनेर, पाचोरा, चोपडा येथेही रब्बीच्या मक्याचे मोठे उत्पादन झाले आहे. सांगली तर मक्याच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. सोलापूर, गोंदिया, बुलढाण्यातही मक्याचे क्षेत्र वाढत असल्याचे येथील ठोक विक्री आणि निर्यातीसाठी मालाचा पुरवठा करणारे मनोज कासलीवाल यांनी सांगितले.

मलेशिया, अरब, श्रीलंका, तैवान, बांगला देश, नेपाळलाही मका निर्यात होतो. नेपाळ, बांगलादेशला जाणारा मका प्रामुख्याने बिहारचा असतो. बिहारनेही मका उत्पादनात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राचा मक्याच्या पिकात चौथे ते पाचवे स्थान आहे. यापूर्वी आपण दुसऱ्या-तिसऱ्या स्थानी असायचो. निर्यातीसाठी मक्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी २९० ते ३०० डॉलरने झालेले करार आता २४० ते २५० डॉलरने केले जात आहेत.

मनोज कासलीवाल, व्यापारी, निर्यातीतील माल पुरवठादार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 04:36 IST
Next Story
सर्व मतदारसंघांत भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर