महाराष्ट्रात एकीकडे पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचं संकट नुकतंच ओसरलं असताना दुसरीकडे करोना मात्र अजूनही राज्यात ठाण मांडून बसला आहे. रोज करोनाच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत गेल्या २४ तासांमध्ये राज्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे मृतांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे एकीकडे चिंता वाढली असतानाच दुसरीकडे काहीसा दिलासा देणारं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तब्बल २५ जिल्ह्यांमधले निर्बंध राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सांगते आकडेवारी?

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ६९५ नवे करोनाबाधित सापडले होते. काल अर्थात ४ ऑगस्ट रोजी हाच आकडा ६ हजार १२६ इतका होता. आजच्या नव्या बाधितांमुळे राज्यात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या ६३ लाख ३६ हजार २२० इतकी झाली आहे. मात्र, यात आजघडीला फक्त ७४ हजार ९९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज दिवसभरातला आकडा पाहिला, तर एकूण ७ हजार १२० रुग्ण करोनावर मात करत बरे झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत करोनाचा यशस्वीपणे सामना करत बरे झालेल्या नागरिकांची संख्या आता ६१ लाख २४ हजार २७८ इतकी झाली आहे. या आकड्यांसोबतच राज्याचा रिकव्हरी रेट देखील आता ९६.६६ इतका वाढला आहे.

मृत्यूदर २.१ टक्क्यांवर!

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, दुसरीकडे राज्याचा मृत्यूदर मात्र अजूनही २ टक्क्यांच्या वरच आहे. राज्यात आज दिवसभरात १२० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. बुधवारी हेच प्रमाण १९५ इतके होते. राज्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ५३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा करोना मृत्यूदर आता २.१ टक्क्यांवर आहे. मात्र, या नोंदणीमध्ये घट दिसत असल्यामुळे हा आरोग्य यंत्रणेसाठी काहीसा दिलासा मानला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona cases in maharashtra update 6695 new cases 120 corona deaths pmw
First published on: 05-08-2021 at 20:04 IST