एक किंवा दोन महिन्यात महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे येऊ शकते करोनाची तिसरी लाट; आरोग्य विभागाचा इशारा

तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात, ज्यांपैकी दहा टक्के मुलेही असू शकतील

Corona Delta plus variant may spark Maharashtra 3rd wave health department
गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सने बुधवारी व्यक्त केली. त्याची गंभीर दखल घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात “डेल्टा प्लस” प्रकार करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

दुसर्‍या लाटेदरम्यान ‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा खूपच जास्त आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्याही जास्त असू शकते. करोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे १९ लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे ४० लाख रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात, ज्यांपैकी दहा टक्के मुलेही असू शकतील, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

हे ही वाचा>> करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’

राज्यातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशभरात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वाधिक महाराष्ट्राला बसला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत आरोग्य विभागाने केलेल्या सादरीकरणात संसर्गाची नवी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्याने त्यातील संभाव्य परिस्थितीचे माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. “करोनाच्या तिसऱ्या लाटेला मर्यादित कसे ठेवायचे ते आपल्या हातात आहे. आपण गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तिसरी लाट मोठी होईल,” असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण वाढवण्याच्या गरज असल्याचे म्हटले. जेव्हा महामारीची पहिली लाट महाराष्ट्रात आली तेव्हा राज्यात कोणतीही मूलभूत सुविधा नव्हती, परंतु त्यानंतरच्या काळात त्यामध्ये वाढ झाली. ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कोविड -१९च्या लसीचे ४२ कोटी डोस देशाला मिळतील आणि त्याचा फायदा राज्यालाही होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे यावर भर देतानाच निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे सांगितले.  इंग्लडसहअन्य इतर काही देशांत पुन्हा विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने निर्बंध लावण्याची वेळ आली आहे याकडेही कृती गटाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

हे ही वाचा>> फायझर, ऑक्सफर्ड लशी ‘डेल्टा’वर परिणामकारक

राज्यातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा के ली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona delta plus variant may spark maharashtra 3rd wave health department abn

ताज्या बातम्या