scorecardresearch

काळूबाई मंदिर परिसरात भाविकांअभावी सर्वत्र शुकशुकाट

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा आज सोमवार (दि १७) पासून सुरू झाली.

विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा

वाई :  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा आज सोमवार (दि १७) पासून सुरू झाली. करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने यात्रेवर बंदी घातल्याने काळूबाई मंदिर परिसरात भाविकांअभावी सर्वत्र शुकशुकाट आहे. मुख्य विश्वस्त व निवडक पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा  झाली. मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. मांढरदेवीच्या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. परंतु मांढरदेव परिसरात जमाबंदी आदेश लागू करण्यात आल्याने व यात्रा रद्द झाल्याने  प्रशासनाने भाविकांना ३१ जानेवारीपर्यंत  मांढरदेव येथे येण्यास बंदी घातली आहे.  त्यामुळे आज मंदिर परिसरात भाविकांविना यात्रा संपन्न झाली. दरम्यान काल रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली व देवीचा छबिना,जागर निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.

आज सकाळी देवीचा गोंधळ घालण्यात आला व सहा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मांढरदेव मंगला धोटे यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली.त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस जी नंदीमठ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे,तहसीलदार रणजित भोसले,विश्वस्त अ‍ॅड. पद्माकर पवार, सीए अतुल दोशी, चंद्रकांत मांढरे,विजय मांढरे, सुनील मांढरे, सुधाकर क्षीरसागर, ओंकार क्षीरसागर, सहसचिव लक्ष्मण चोपडे यांच्यासह निवडक पुजारी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे  काळूबाई देवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे.  मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहेत. मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे व वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक, दहा उपनिरीक्षक, ८७ पुरुष, २० महिला वाहतूक कर्मचारी, २४ होमगार्ड, १ दंगा काबू पथक, जलद कृती दलाची तुकडी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महसूल विभागाचे अधिकारी नेमणुकीवर आहेत. या सर्वाना येथील कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. मांढरदेवीला येणाऱ्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौक व वाई एमआयडीसी त्याचबरोबर कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona devotees kalubai temple area lull everywhere ysh

ताज्या बातम्या