scorecardresearch

“मास्कचा वापर ऐच्छिक केलाय, पण…”, महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण!

राजेश टोपे म्हणतात, “५० टक्के उपस्थिती, मास्क, दुहेरी लसीकरण, मास्कसक्ती हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण याचा अर्थ लोकांनी बिनधास्तपणे वागावं असा नाही. लोकांनी…”

rajesh tope on mask corona restrictions in maharashtra
राजेश टोपे यांनी मास्कसक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील करोनाचे निर्बंध, राज्यातील करोनाची परिस्थिती आणि आगामी सण उत्साहात साजरे करण्याची नागरिकांची इच्छा, या पार्श्वभूमीवर करोनाचे निर्बंध कधी उठवले जाणार? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी काढल्यानंतर त्यावरून विरोधकांनी रान उठवलं होतं. निर्बंध चुलीत घालण्याची भाषा देखील विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने करोनाबाबतचे सर्वच निर्बंध उठवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यासोबतच मास्क बंधनकारक न ठेवता ऐच्छिक ठेवल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यावर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सर्व प्रकारचे निर्बंध मागे…

“२ एप्रिलला असणाऱ्या गुढीपाडव्यापासून आपण राज्यातील करोनासंदर्भातील सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थिती, मास्क, दुहेरी लसीकरण, मास्कसक्ती हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण याचा अर्थ लोकांनी बिनधास्तपणे वागावं असा नाही. लोकांनी काळजी घ्यायला हवीच”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

मोठी बातमी! राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध हटवले; आता मास्क देखील ऐच्छिक!

“अनिवार्य नसला, तरी ऐच्छिक आहेच”

दरम्यान, मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “अनिवार्य नसला, तरी ऐच्छित मास्क वापर आहेच. तसेच, मास्कचा वापर ऐच्छिक केला असला तरी लोकांनी आपली आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तिथे मास्क घालावा. त्यामुळे गुढीपाडवा, मुंबईतल्या शोभायात्रा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे दिवस उत्साहात आपण साजरे करू शकू. येणारे सण देखील पूर्ण उत्साहात साजरे करता येतील”, असं राजेश टोपे म्हणाले.

“ऐच्छिक केलं आहे याचा अर्थ काळजी घेऊन आपल्याला काम करायचं आहे. अमेरिका, इंग्लंड, युरोपमधील देशांनी मास्क मुक्त केले आहे. पण आपल्याकडे आपण ऐच्छिक केलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर सर्वांनीच टास्क फोर्स, आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona restrictions in maharashtra lifted health minister clarifies on mask use pmw

ताज्या बातम्या