करोना चाचणीचे दर आणखी कमी ! आरटीपीसीआर चाचणीसाठी १२०० रुपये

आता करोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढवण्याची गरज

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संदीप आचार्य 
मुंबई: करोनाला अटकाव करण्यासाठी माफक दरात व कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेनुसार आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर आता १२०० रुपये एवढा कमी केला आहे.

करोना रुग्ण वेगाने शोधण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे तसेच रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध याची आवश्यकता असून यासाठी चाचण्यांचे दर कमी होणे गरजेचे होते. यापूर्वी करोना चाचणीसाठी महाराष्ट्रात ४५०० रुपये प्रतिचाचणी मोजावे लागत होते. हे दर कमी करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यावेळी करोना चाचणी करणार्या सर्व खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर सखोल चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ करोना चाचणीचे दर ४५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. याबाबत डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालात हा चाचणी दर आणखीही कमी होऊ शकतो असे नमूद करण्यात आले होते. यासाठी केंद्र सरकारने या चाचणीसाठी लागणार्या रिएजंटस् वरील जीएसटी व आयात कर माफ केल्यास हे दर निश्चित कमी होतील असे स्पष्ट केले होते.

दरम्यानच्या काळात ‘आयसीएमआर’ने अॅण्टीबॉडी चाचणीलाही मान्यता दिली असून या चाचणीसाठी सध्या ५५० ते ६०० रुपये खर्च येतो. करोनाला वेगाने अटकाव घालायचा असल्यास जास्तीतजास्त चाचण्या झाल्या पाहिजे असे ‘आयसीएमआर’ तसेच अनेक ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जास्त चाचण्या व कमीतकमी वेळात चाचणीचा निकाल आल्यास करोना रुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे. जास्त चाचण्या केल्यास करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढेल मात्र उपचार व करोना रोखण्यासाठी त्याचीच गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातूनच करोना चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती नेमण्यात आली होती.

दरम्याने गेल्या महिन्यात टास्क फोर्सच्या डॉक्टरांबरोबरील बैठकीत जास्त चाचण्या करण्याचा तसेच चाचणी दर आणखी कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव यांनी आग्रह धरला. त्यानुसार डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर आज ७ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने आदेश जारी करून खासगी चाचणी केंद्रावर जाऊन करोना चाचणी केल्यास १२०० रुपये दर जाहीर केला आहे. जर रुग्णाचे चाचणी सॅम्पल करोना केंद्रातून जमा केल्यास चाचणीसाठी १६०० रुपये तर घरांमधून सॅम्पल घेतल्यास २००० रुपये दर निश्चित करण्यात आले असून यापेक्षा जास्त दर खासगी चाचणी केंद्रांना आकारता येणार नाही.

प्रामुख्याने मुंबईत दररोज किमान ३० हजार करोना चाचण्या झाल्या पाहिजेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. “पुण्यामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून जवळपास दहा हजार चाचण्या केल्या जात असून मुंबईतही येत्या काही दिवसात दहा हजार चाचण्या केल्या जातील” असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. राज्यात आज शंभरच्या आसपास करोना चाचणी प्रयोगशाळा असून यात जवळपास निम्म्या प्रयोगशाळा खाजगी आहेत. राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या महिन्यात चाचणीचे दर ४५०० रुपयांवरून २२०० रुपये करण्यात आले असून हे दर आणखी कमी करावयाचे असल्यास केंद्रसरकारने ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी लागणारे रिएजंटस् व अन्य बाबींवरील जीएसटी व इतर शुल्क माफ केले पाहिजे. तसे केल्यास या चाचणीचा दर सध्याच्या २२०० रुपयांवरून कमी होऊ शकतील हे लक्षात आले होते. त्यानुसार डॉ. शिंदे यांच्या समितीने आता करोना चाचणीचे दर १२०० रुपये केली आहे. या पार्श्वभूमीवर आता करोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona test rates even lower now 1200 for rtpcr test scj