बीड : महिनाभर करोनाबाधित रुग्णवाढीचा वेग काहीसा कमी झाला असला, तरी मागील दोन आठवडय़ांत साडेचारशेपेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यू रोखण्याचे आव्हान कायम आहे. दररोज एक हजाराच्या पुढे असलेली बाधितांची संख्या रविवारी नऊशेवर आल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बीड जिल्ह्यात रविवारी नवीन ८९७ बाधितांची नोंद झाली असून मागील वीस दिवसांपासून दर दिवस एक हजाराच्या पुढे असलेला हा बाधितांचा आकडा रविवारी नऊशेच्या घरात आल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. रुग्णवाढीचा वेग कमी झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही कमी होण्याची आशा निर्माण झाली असली, तरी मागील पंधरा दिवसांतील करोना बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे. १ मे रोजी जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार एकूण मृत्यू ९४२ तर १६ मे रोजीच्या अहवालात ही संख्या १ हजार ४२३ नोंदवल्याने पंधरा दिवसांत करोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा साडेचारशेच्या घरात गेला आहे. यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ११४ तर जिल्हा रुग्णालयात ११० रुग्णांच्या मृत्यूची नोंद असून उपजिल्हा आणि इतर रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडाही अहवालात नोंदवण्यात आला आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम मोठय़ा प्रमाणात राबवली जात असून रुग्णवाढीचा वेग काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. बाधितांबरोबर बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. रविवारी दिवसभरात १ हजार ९५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून जिल्ह्यात सध्या ६ हजार ३४७ बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.