राज्यात एकीकडे लसीकरणाचा वेग वाढलेला असताना दुसरीकडे करोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील कमी होऊ लागला आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण ११९३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण करोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या आता ६६ लाख १४ हजार १५८ इतकी झाली आहे. यातले फक्त १५ हजार ११९ अॅक्टिव्ह रुग्ण असल्यामुळे करोनाचं स्वरुप हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. दिवसभरात एकूण १५१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता तब्बल ६४ लाख ५५ हजार १०० इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.६ टक्क्यांवर गेला आहे.

यासोबतच राज्यातील मृतांचा आकडा देखील कमी होऊ लागला आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३९ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे करोनाच्या एकूण मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ३१३ इतका झाला आहे. तर राज्याचा करोना मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर आहे.