राज्यात करोना लसीकरण १०० टक्के करण्यासाठी आता राज्य सरकार विविध उपाययोजना करताना दिसत आहे. तर, मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात अजुनही शंका दिसून येत आहे. त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक फारसे पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची देखील मदत घेणार आहे. यावरून भाजपा आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला जात असताना, आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या मागची सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

“करोना संक्रमण रोखण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण प्रशासनाशी चर्चा करून ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक व्यक्तीला लशीचा किमान एक डोस मिळालेला असावा,अशी भूमिका घेतली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ या मोहीमेअंतर्गत लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम हे घराघरात जाऊन होत आहे. तसेच वेगवेगळ्या समाजांमध्ये लसीकरणाचे प्रबोधन करण्यासाठी धर्मगुरु, मौलवी, स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी करण्यात येत आहे. यामध्ये कोणी सेलेब्रिटी सहभाग घेत असेल तर ते कोण्या एका समाजाचे सेलिब्रिटी नसतात अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली. यामध्ये कुठेही राजकारणाचा लवलेश नाही. देशात कोरोना संक्रमाची सुरूवात झाल्यापासून यात कोणतेही राजकारण नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे लसीकरणात कोणतेही धार्मिक राजकारण न करता लसीकरण लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, हा मुख्य हेतू ठेवायला हवा.” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना याबाबत सांगितले की, “विविध धर्मांमध्ये जर लसीकरणाबाबत कुठे काही शंका असतील, तर त्यांना देखील आपण सहभागी करत आहोत. धर्मगुरू, मौलवी, सर्व पक्षीय लोकांना आपण सहभागी करत आहोत. म्हणून मला सांगायचं एवढच आहे की जर यामध्ये सेलिब्रिटी जर कुणी येत असेल, सहभाग घेत असेल वेगवेगळ्या मार्गाने…मराठी, हिंदी मधील असतील. तर त्यामध्ये मुंबई मनपाचे आयुक्त यांनी स्वतः सलमान खानला विनंती केली. सलमान खानने व्यवस्थित व्हिडिओ केला तो पाठवला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी लस घेतली पाहिजे. आता अशा पद्धतीचे जे कुणी सेलिब्रेटी असतील, ते कुठल्या समाजाचे वैगरे नसतात. सेलिब्रेटी हे सर्वांचेच असतात, सर्व देशाला प्रिय असतात. मला असं वाटतं की त्यामध्ये राजकारणाचा कुठलाही लवलेश असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की पहिल्या तारखेपासून कोविड या महामारीच्या बाबतीत राजकारण नको हे सर्वच पक्षांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे लसीकरण हा एक कोविडचाच महत्वाचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये देखील राजकारणाचा काहीच विषय नाही. याला एका चांगल्या उदात्त भावनेने बघितलं पाहिजे, चांगल्या विचाराने बघितलं पाहिजे कारण आपल्याला लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे हा त्या मागचा मुख्य हेतू येतो. ”

आता ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत

याचबरोबर “लसीकरण करणं हे आता जागतिकस्तरावर सगळ्यांचाच अग्रक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जे जिल्हे देशाच्या सरासरीच्या किंवा राज्याच्या सरासरीच्या कमी आहेत, त्यांना देखीवल थेट बोलण्याचं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री या नात्याने मी आणि आम्ही सर्वांनी देखील संपूर्ण प्रशासनाची बैठक घेऊन ३० नोव्हेंबपर्यंत किमान एक तरी डोस महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मिळालाच पाहिजे. या पद्धतीचं आम्ही धोरण केलं आणि कृती करत आहोत. या गोष्टीसाठी राज्यासाठी जर म्हणाल तर मिशन कवचकुंडल आणि देशस्तरावर आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे दस्तक घर घर या मोहीमेअंतर्गत आपण ८० टक्क्यांच्या पुढे आता लसीकरण महाराष्ट्रात झालेलं आहे. आता जे उर्वरीत २० टक्के राहिलेले आहे ते नक्कीच आव्हानात्मक काम आहे. कारण, एकतर स्वतःहुन येणं कधीकधी पसंत करत नाहीत. त्यांना एकतर गैरसमज असतो काहींना कामं असतात, त्यामुळे त्यांना दुय्यम महत्व वाटतं. काहींच्या लसीकरणाबाबत वेगळ्या धारणा असू शकतात. त्यामुळे या मोहीमेअंतर्गत हे काम घराघरात जाऊन करावं, असंच आमचा आरोग्य विभाग करत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की त्यासाठी विविध उपाय आम्ही करत आहोत. उदाहरणार्थ लोकांना घराघरात जाऊन समजावून सांगणे, गैरसमज दूर करणे. आता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तला सांगितले आहे की, शहर असेल तर वॉर्डनिहाय जे लोक राहिले आहेत त्यांची यादी त्या वॉर्ड अधिकाऱ्याला द्यायची. आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्त्यांना द्यायची आणि त्यांनी घरोघरी जायचं. ग्रामीण भाग असेल तर आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, सीएचओ हे सगंळ हे करतो.” अशी देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी माहिती दिली.

“कोणत्या विशिष्ठ धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी?”; सलमान खानची मदत घेणाऱ्या ठाकरे सरकारला राम कदमांचा सवाल

“सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणी काँग्रेसच्या हेतुबाबत शंका जरूर आहे.” असं राम कदम यांनी ट्विट करून म्हटलंय.

जालन्यामध्ये सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले होते की, “मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही लसीबद्दल शंका आहे. आम्ही यासाठी आता सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत.” धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्याचं म्हणणं लोक ऐकतील असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला होता. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.