#Coronavirus : मुंबईत ४, पुण्यात २ संशयित रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार

कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशातील विमानतळांवरच विशेष खबरदारी घेतली जात आहे.

चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत. या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले ४ संशयित मुंबईत आढळून आले असून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुण्यातही २ संशयित आढळून आले असून त्यांच्यावर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत राज्य सरकारच्या हवाल्याने एएनआयने ट्विट केले आहे.

एएनआयच्या ट्विटनुसार, महाराष्ट्र सरकारने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २६ जानेवारीपर्यंत ३७५६ प्रवाशांची स्क्रिनिंग (तपासणी) केलं आहे. यामध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणं असल्याचे ४ संशयित प्रवाशी आढळून आले आहेत. या चौघांना मुंबई महापालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्षात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आणखी २ संशयित पुण्यात आढळून आले असून त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. भारताने खबरदारी म्हणून विमानतळावरच चीन आणि शेजारच्या देशातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीची व्यवस्था केली आहे.

चीन बांधणार स्वतंत्र हॉस्पिटल

घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीन युद्धपातळीवर नवे रुग्णालय उभे करणार आहे. या आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच हे रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. येत्या तीन फेब्रुवारीपासून फक्त कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी या रुग्णालयाचा वापर करण्याचा चीनचा उद्देश आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे नेमके काय होतं?

कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus 4 suspected treated at government hospital in mumbai and 2 in pune aau

ताज्या बातम्या