जैन इरिगेशन आणि जैन फाऊंडेशनचे आदर्श कार्य

जळगाव : करोना काळात रुग्णांना प्राणवायू यंत्र (कॉन्सन्ट्रेटर), हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य आणि सलग साडेचारशेहून अधिक दिवस ११ लाखापर्यंत पोहचलेली ‘स्नेहाची शिदोरी’.. आदी उपक्रमांतून येथील ‘जैन इरिगेशन आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ यांनी जनसेवेचा आदर्श समोर ठेवला आहे.

करोना रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना भोजन, गरजूंच्या भोजनाची व्यवस्था, शहराचे र्निजतुकीकरण, बाधितांचे सर्वेक्षण, करोना योद्धय़ांची सेवा, ताप-प्राणवायू मापन यंत्रांचे वाटप, करोनाबाबत जनजागृती असे पहिल्या टाळेबंदीपासून सुरू झालेले उपक्रम दुसरी लाट ओसरत असतानाही अव्याहतपणे सुरू आहे. ही सर्व सेवा नि:शुल्क दिली जात आहे.

जैन इरिगेशन आणि कंपनीची सेवाभावी संस्था ‘जैन इरिगेशन आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ नागरिकांच्या मदतीला धावली. या महामारीत अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. हे लक्षात घेत कु णी उपाशी राहू नये, या विचारातून ‘स्नेहाची शिदोरी’ या उपक्रमांची संकल्पना राबवण्यात येत आहे. पहाटे चारपासून जैन हिल्स येथील राजाभोज भोजनालयात ४० जणांचे पथक भोजन निर्मितीला सुरूवात करते. शासकीय निकषांचे पालन करताना र्निजतुक वेष्टन, सुरक्षित पुरवठय़ाची दक्षता घेतली गेली. तयार भोजन शहरातील कांताई सभागृहात नेले जाते.

तेथे गरजेनुसार संस्था, संघटना प्रतिनिधींना वाटपासाठी जैन स्पोर्ट्सचे पदाधिकारी आणि खेळाडूंचे सहकार्य मिळते. (एका व्यक्तीला दिवसभरासाठी लागणारे सकस अन्न ‘स्नेहाच्या शिदोरी’तून दिले जाते. सकाळी चार पोळ्या, भाजी, चटणी, तर संध्याकाळी ४०० ग्रॅम खिचडीचा समावेश आहे.) रोजच्या भोजनाची गुणवत्ता, वेगळेपण, चव आणि वेष्टण यावर कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन आणि सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्तिश: लक्ष दिले आहे. सणासुदीला आमरस, शिरा, लाडू हेही पदार्थ दिले जात आहेत. उपाहारगृहे, खानावळी आणि अन्नछत्रे बंद असतानाही हा उपक्रम अविरत सुरू आहे. गृहविलगीकरणातील करोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही याचा लाभ झाला. संबंधितांपर्यंत भोजन पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली.

करोनाच्या जागतिक साथीमुळे अनेकांचे आर्थिक समीकरण बिघडले. रोजंदारीवर काम करणाऱ्यांची उपासमार होऊ  लागली. संबंधित कुटुंबांना साखर, तेल, डाळ, मसाले आणि इतर साहित्य देण्यात आले. चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा या आदिवासीबहुल भागातही त्याचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणातील रुग्णांनाही प्राणवायूची गरज भासत होती. अशा रुग्णांसाठी २७ प्राणवायू पुरविणारी यंत्रे नि:शुल्क उपलब्ध करण्यात आली.

सर्वेक्षण, जनजागृती

कांताई नेत्रालय आणि जैन हेल्थ केअरच्या माध्यमातून ३९ कॉलनीतील सुमारे साडेचार हजार घरांतील १४ हजारांहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. करोना आजाराविषयी शास्त्रोक्त माहिती, प्रतिबंधाचे मार्ग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन याविषयी माहिती देणाऱ्या एक लाखाहून अधिक पुस्तिका घरांमध्ये वितरित करण्यात आल्या. डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, पोलीस, गृहरक्षक अशा १३ हजारांहून अधिक योद्धय़ांना शक्तीदायी पेयाचे वाटप करण्यात आले. र्निजतुकीकरणाची मोहीम राबविली.

समर्पण

आणि सेवा जोपासण्याचा संस्कार देणारे माझे वडील भवरलाल जैन यांनी गरीब नागरिक उपाशी राहू नयेत, अशी संवेदनशीलता व्यक्त केली होती. त्यामुसार करोना संकटात आम्ही ‘स्नेहाची शिदोरी’ हे अन्नछत्र सुरू केले. ही सेवा यापुढेही गरजू नागरिकांसाठी अविरत सुरू राहणार आहे. – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स, जळगाव</strong>