|| एजाज हुसेन
करोनामुळे आर्थिक अडचणीत वाढ

सोलापूर : करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्यामुळे जनजीवन हळूहळू सुरळीत होत असले तरी गेल्या दीड वर्षात करोनामुळे ओढवलेले आर्थिक अरिष्ट अजून आपली पाठ सोडायला तयार नाही. सोलापूरसारख्या बहुसंख्य गरीब श्रमिकांच्या शहरात अलीकडे घडलेल्या काही घटना पुरेशा बोलक्या आहेत. किंबहुना या घटना सामाजिक स्थितीच दर्शविणाऱ्या आहेत.

करोना प्रादुर्भावाच्या पाठोपाठ आलेल्या अर्थसंकटामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब कुटुंबीयांची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी धडपड सुरू आहे. घरेलू महिला कामगारांना बेरोजगारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा असाहाय्यतेचा फायदा उठवत काही महिलांना देहविक्रयाच्या व्यवसायात ओढण्याचा प्रकार सुरू आहे.

पूर्व भाग-न्यू पाच्छा पेठेतील एका महिलेची कहाणी समाजाचे डोळे उघडणारी आहे. बेजबाबदार नवरा काहीही कामधंदा न करता व्यसनात बुडालेला. ही महिला काही मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या घरी धुणी-भांडीची कामे करीत कसाबसा उदरनिर्वाह चालवायची. परंतु घरेलू कामे बंद झाली. त्यातच नवऱ्याने दारूसाठी पैसे देत नाही म्हणून   घरातून हाकलून दिले. ११ वर्षीय मुलगी आणि आठ वर्षीय मुलगा यांच्यासह ती रस्त्यावर आली.

 परंतु जिद्द बाळगून तिने जीवनाची लढाई तीव्रतेने चालविताना निवाऱ्यासाठी झोपडी भाड्याने घेतली. सुरुवातीला कसेबसे झोपडीचे भाडे भरणे शक्य झाले, पण नंतर अशक्य ठरले. चोहीबाजूंनी संकटे येऊ लागली. अलीकडे तीन दिवस तर मुलांच्या पोटात अन्न नव्हते. या महिलेने धीर सोडला आणि दोन्ही मुलांना सोबत घेऊन ती विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज कंबर तलावावर आली. तेथे गणेशोत्सवासाठी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोला सोळुंके, महिला पोलीस हवालदार पी. पी. पात्रे, सारिका लोखंडे यांनी संशयावरून तिला हटकले. ती मुलांसह तलावात उडी मारून आत्महत्येचा मार्ग पत्करणार होती. तिला मानसिक आधार देऊन आत्महत्येपासून परावृत्त केले गेले. या महिलेला जीवदान मिळाले असले तरी त्यांची दररोजच्या जगण्याची लढाई लढण्यासाठीचे बळ आणायचे कोठून, हा प्रश्न आहेच.

करोनाच्या संकटात अर्थचक्र थांबल्याचा फटका अनेक उद्योगधंद्यांना बसला आहे. त्यापैकीच आनंद कृष्णाहरी कोडम (वय ४५, रा. वज्रेश्वरनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांची ही कहाणी. करोनापाठोपाठ आलेल्या टाळेबंदीमुळे कोडम यांचा सूत उत्पादनाचा कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला. स्वत:ला सावरण्यासाठी म्हणून त्याने ओळखीच्या व्यक्तींकडून उसने पैसे घेतले. काही जणांकडून कर्जही घेतले. परंतु कारखाना बंद पडल्यामुळे त्यांचा आर्थिक डोलारा कोसळला आणि घेतलेली हातउसनी रक्कम, घेतलेले कर्ज परत फेडायचे कसे, या विवंचनेत त्यांची झोप उडाली. त्यातूनच कोडम याने चक्क चोरीचा मार्ग पत्करला आणि पोलिसांनी त्याला पकडले.  ही उदाहरणे बरीच बोलकी आहेत. यातून मार्ग काढण्याचा अनेकांसमोर प्रश्न उभा ठाकला आहे.