scorecardresearch

करोना हाताळणीवरून आरोप-प्रत्यारोप; इस्लामपूरमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर  विरोधकांचा आरोप

इस्लामपूरवर गेल्या तीन दशकांच्या कालावधीत पालकमंत्री जयंत पाटील यांचीच एकहाती सत्ता होती.

karnataka hijab row Jayant Patil role on hijab issue
(संग्रहित छायाचित्र)

|| दिगंबर शिंदे

इस्लामपूरमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर  विरोधकांचा आरोप

सांगली : इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलमधील रुग्णसेवेवरून सध्या राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून पालकमंत्री जयंत पाटील आणि माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

करोनाकाळात रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचार आणि उपचाराच्या खर्चावरून रुग्णालय प्रशासनाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असताना याविरुद्ध आत्मक्लेश, जनजागृती अभियान करून दबाव आणण्याचे राजकारण सुरू आहे. मुळात यामागे आगामी नगरपालिकेचे रणांगण कारणीभूत असून यातून विकासकामापेक्षा राजकीय हेतूच अधिक प्रकर्षांने पुढे येत आहे.

इस्लामपूरवर गेल्या तीन दशकांच्या कालावधीत पालकमंत्री जयंत पाटील यांचीच एकहाती सत्ता होती. मात्र, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयंत पाटील विरोधक एकसंघ झाल्याने विकास आघाडीच्या झेंडय़ाखाली सत्तांतर घडले. आता मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या विकास आघाडीतही बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सांगली-मिरजेनंतर वाळवा, शिराळा तालुक्यात वैद्यकीय सेवा देणारे केंद्र म्हणून इस्लामपूरची ओळख आहे. याच इस्लामपुरातील प्रकाश मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे साडेसातशे खाटांचे प्रकाश हॉस्पिटल सध्या राजकीय आखाडा बनू पाहात आहे. करोनाकाळात प्रकाश हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर झालेल्या उपचाराबाबत आणि खर्चाबाबत काही शंकास्पद बाबी समोर आल्या आहेत. योगेश खोत यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करीत असताना या बाबी ठळकपणे पोलीस तपासात पुढे आल्या आहेत.

तपासाकामी ताब्यात घेण्यात आलेल्या रुग्णांच्या कागदपत्रामध्ये  फेरफार करण्यात आल्याचा संशय तपास पथकाला आहे. रुग्णांच्या उपचाराची नोंद करीत असताना करण्यात आलेले औषधोपचार, तपासणीचा अहवाल यामध्ये तफावत दिसून आली असून असे १९६ रुग्णांच्या फाइलमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. करोना रुग्णांच्या उपचाराचा खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शासनाकडून देण्यात येतो. याचाच  फायदा घेऊन काही बोगस प्रकार केले असल्याचा संशय आहे. या संशयाला पुष्टी देणारी कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. याचा तपास अयोग्य असेल तर न्यायालय याबाबतचा निर्णय देईल. सध्या हे प्रकरण न्यायालयीन पातळीवर असल्याने याबाबत अधिक भाष्य करणे गैरलागू ठरत असले तरी प्रकाश हॉस्पिटल प्रशासनाकडून आंदोलनाची भूमिका घेणे कितपत योग्य म्हणावे.

प्रकाश हॉस्पिटलमधील करोनाकाळात झालेल्या गैरप्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर तपास करणे हा पोलिसांचा कामाचा भाग आहे. पालकमंत्री जयंत पाटील तपास यंत्रणेवर दबाव आणत असल्याचा आरोप करणे हास्यास्पद असून जर विरोधकांची बाजू योग्य असेल तर न्यायालयात सिद्ध होईलच, भय बाळगण्याचे कारणच काय?

 – शहाजी पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

करोनाकाळात रुग्णांवर चांगले आणि योग्य उपचार झाले असतानाही केवळ राजकीय असूयेपोटी कर्मचाऱ्यांना खोटय़ा गुन्ह्यात अडकवून त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाकाळात १ हजार ५१५ रुग्णांवर रुग्णालयात व्यवसाय न करता केवळ मानवतेच्या भूमिकेतून रुग्णसेवा केली. तरीही बदनामी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत असतील तर जनताच योग्य ते उत्तर देईल.

– अभिजीत पाटील, अध्यक्ष, कामगार युनियन

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona hosptial guardian minister jayant patil in islampur akp

ताज्या बातम्या