रवींद्र जुनारकर

बारा दिवसांत ४०५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार;

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार ३०७ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील बारा दिवसात करोनामुळे मृत्यू पावलेल्या ४०५ मृतदेहांवर पठाणपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले, मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कालावधीत ३०७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली. याचाच अर्थ चंद्रपूर जिल्हा प्रशासन करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृतांचा हा आकडा हिंदू स्मशानभूमीचा आहे. मुस्लीम तथा ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची आकडेवारी समोर आलेली नाही. याचाच अर्थ मृतांचा आकडा हा कितीतरी अधिक आहे. जिल्हा प्रशासन लपवालपवी करीत असल्याची चर्चा आहे.

या जिल्हय़ात करोनाबाधितांची संख्या व मृत्यू दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या व मृत्यूची आकडेवारी यात नेमकी खरी आकडेवारी कोणती हा संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मृतांची दररोजची आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांकडे पाठवली जात आहे. त्यानुसार करोनामुळे आतापर्यंत जिल्हय़ात ९५४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ५५० मृत्यू हे एकटय़ा एप्रिल महिन्यातील आहेत. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने २० एप्रिल ते १ मे या बारा दिवसांच्या कालावधीत ३०७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, असे आकडेवारीनुसार सांगितले आहे. प्रत्यक्षात पठाणपुरा गेटबाहेरील स्व. नारायण पाटील स्मृती शिव मोक्षधामचे सचिव श्याम धोपटे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मागील बारा दिवसात ४०५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ पठाणपुरा स्मशानभूमीत बारा दिवसात ९८ मृतदेह अधिकचे जाळण्यात आले आहेत. सर्वाधिक ४३ मृतदेह हे ३० एप्रिलला जाळण्यात आले आहे. हा आकडा एकटय़ा हिंदू स्मशानभूमीचा आहे. मुस्लीम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची आकडेवारीचा यामध्ये समावेश केलेला नाही. तसेच मृतांचा हा आकडा महापालिका हद्दीतील करोना रुग्णालयामध्ये मृत पावलेल्यांचा आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये मृत्यू पावलेल्यांचा आकडा नाही. ही आकडेवारी बघितली तर मृतांचा आकडा जिल्हा प्रशासन लपवण्याचे काम करत आहे, अशी चर्चा वर्तुळात सुरू आहे. पठाणपुरा शिव स्मशानभूमीचे सचिव श्याम धोपटे यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात आजवर सर्वाधिक ४३ मृतदेह जाळण्यात आलेले आहेत. मात्र करोना काळात एकाच दिवशी ४३ मृतदेह जाळले आहेत. जेव्हा स्मशानभूमीत ४३ मृतदेह जाळले जात आहे, तेव्हा मृत्यू पावलेल्यांची संख्या निश्चितच अधिक आहे. एका दिवशी सकाळ तथा सायंकाळ अशा दोन सत्रात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. तसेच तेलंगणा राज्यातील मंचेरिअल, करीमनगर, कागजनगर येथे उपचारार्थ गेलेल्या व मृत्यू पावलेल्यांच्या आकडेवारीचा देखील यात समावेश नाही. त्यामुळे मृत्यूची खरी आकडेवारी कोणती हा प्रश्न आता पडला आहे.

प्रत्येक मृत्यूची नोंद होतेच

करोना चाचणी केलेल्या प्रत्येक बाधिताची पोर्टलवर नोंद असते, त्यांच्यावर उपचार सुरू असेल, रुग्णालयामधून दुरुस्त होऊन घरी परतला असेल किंवा मृत्यू झाला असेल तर या प्रत्येकाची नोंद असते. त्यामुळे मृत्यूचे आकडे लपवाछपवीच्या चर्चेला काही अर्थ नाही. प्रत्येक मृत्यूची नोंद ही होतेच. मध्यंतरी चंद्रपूर जिल्हय़ातील असंख्य रुग्ण तेलंगणातील मंचेरिअल, कागजनगर, करीमनगर येथे गेले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि चंद्रपुरात मृतदेह आणून त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला असेल तर या आकडय़ात फरक पडू शकतो. तसेच ग्रामीण भागातील अनेक मृत व्यक्तींचे मृतदेह देखील शहरात आणले जात आहे. त्यामुळे आकडय़ात फरक पडू शकतो.

– अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर