राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीस कमी होताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यपाही करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. तर दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८ हजार ९५० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज १२४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,७४,५९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५२,६०,४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,०५,१९० (१३.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७७,६१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,००,४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!; ICMR च्या अभ्यासातून खुलासा

करोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत. तर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं. करोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते. त्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.