गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी करोनाचा पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना तसेच माहितीही दिली. मागील काही दिवसांपासून सातत्याने फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे प्रयत्न केले. “जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. त्यांच्यावर वेळेचे बंधन नसणार. भाजीपाल्याची दुकानेही सुरुच राहणार आहेत. तरी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करु नये,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच त्यांनी आपण घरी बसून काय करतोय हे ही यावेळेस सांगितलं.

“मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे,” असं म्हणतच मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. “सर्वांना आता करोना व्हायरस आणि त्याच्या गांभीर्याची पूर्ण कल्पना आली आहे. या संकटाकडे आपण आतापर्यंत नकारात्मक पद्धतीने बघत आलो आहोत. ते तसंच आहे खरं तर. कारण घराबाहेर पडू नका ही माझी सर्वांसाठी सूचना आहे. या सूनचनेचं कारण म्हणजे या संकटाची तुलना मी आधीच जागतिक युद्धाशी केली आहे. युद्ध हे युद्ध असतं आणि तिथे आपला शत्रू हा नकळतपणे आपल्यावर वार करत असतो. शत्रू जेव्हा समोर नसतो तेव्हा संकट मोठं असतं. कारण हा शत्रू दिसत नाही आपल्याला. हा करोनाचा शत्रू तसाच आहे. घराबाहेर पडलं तर हा शत्रू कुठून हल्ला करेल सांगता येत नाही. घरामध्येच राहा. घराबाहेर आपण पाऊल टाकलं तर शत्रू आपल्या घरामध्ये पाऊल टाकेल. यामध्ये सकारात्मक काय आहे. मला बरेच फोन येतातय, सोशल मिडियावर आपण पाहतोय की अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी कुटुंब एकत्र आली आहेत. आई-वडील, आजी-आजोबा, मुलं, नातवंड हे सर्वचं एकत्र आले आहेत. कोणी वाचन करतय, कोणी संगीत ऐकतयं, कोणी कॅरम खेळतयं. तर आपण जे गमावलं होतं ते यानिमित्ताने आपण आपली हैस भागवून घेत आहोत. काही वाईट नाही चांगली गोष्ट आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- आपल्या वर्तमान काळावरच भविष्य अवलंबून : मुख्यमंत्री

“आता तुम्ही म्हणाल की घरी बसून काय करायचं. मलाही कोणीतरी विचारलं की तुम्ही घरात काय करता? त्यावर मी म्हटलं की मी मिसेस मुख्यमंत्र्यांच ऐकतोय. तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका. आहे ही थोडी सकारात्मक बाजू आहे,” असंही मुख्यमंत्र्यांनी हसत हसत सांगितलं. तसेच पुढच्याच वाक्यात त्यांनी, “मी तुमच्याशी असा गंमतीजंमतीमध्ये बोलत असतो तरी संकट गेलं आहे असं समजू नका,” असं सांगत करोनापासून बचाव करण्यासाठी आपल्याला घरातच थांबायचं आहे हे लक्षात घ्या असंही पुन्हा अधोरेखित केलं.