राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येतही घट सुरू आहे. मात्र अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत भर पडतच आहे. तर, दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा काहीशी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक जण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरात आज दिवसभरात १३ हजार ५१ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार १७ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,९३,४०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ५६, ४८, ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.