करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून ज्यांना करोनासदृश्य लक्षण आढळून येत आहेत. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहेत. मात्र, अनेक जण क्वारंटाइनमधून पळून जात असल्याचे प्रकार सातत्यानं समोर येत आहे. अहमदनगरमध्येही अशीच घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पळून जाणारा संशयित रुग्ण चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी आहे. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलेल्या या अधिकाऱ्यानं क्वारंटाइनमध्ये राहण्याच सांगताच तिथून पळ काढला. या अधिकाऱ्याचा आता पोलिसांकडून शोध घेणं सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयात दुय्यम निरीक्षक असलेला एक अधिकारी पुण्याला गेला होता. पुण्याहून परत अहमदनगरला आल्यानंतर तो आजारी पडला. सर्दी, खोकला असल्यामुळे एका खाजगी डॉक्टरकडे हा अधिकारी गेला. त्यानंतर करोनासदृश्य लक्षणं असल्याचं लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्यानं जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रविवारी (१२ एप्रिल) दुपारी त्याचा रुग्णालयातील डॉक्टरांनी चाचणीसाठी घशातील स्त्राव घेतला. त्यानंतर त्याला रुग्णालयातच क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं.

एक वॉर्डबॉय या अधिकाऱ्याला क्वारंटाइन कक्षाकडे घेऊन जात होता. याचवेळी अधिकाऱ्यानं त्याची नजर चुकवून धूम ठोकली. सुरूवातीला कुठेतरी हा अधिकारी गेला असेल, परत येईल वॉर्डबॉयला वाटलं. थोड्या वेळानं त्यानं शोधही घेतला पण, अधिकारी कुठेही सापडला नाही. त्यामुळे रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनानं तोफखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या अधिकाऱ्याचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. पोलिसांना अधिकारी सापडला नाही, तर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.