राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.  सोलापुरात आज करोनाची बाधा झालेले चार नवे रूग्ण आढळून आले.  मागील अकरा दिवसांत रूग्णांची एकूण संख्या 37 पोहचली आहे. यामध्ये तीन मृतांचा समावेश आहे.

दरम्यान, आज (गुरूवार)दुपारी नवे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापुरात येऊन करोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यात कठोर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने शहरात संचारबंदी आणखी चार दिवस काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याची भरणे यांनी माहिती दिली. 20एप्रिलपासून शहरात संपूर्ण संचारबंदीचा कडक अंमल आहे. जीवनाश्यक वस्तू सेवांपैकी केवळ दुधाचा (सकाळी 6 ते 9) अपवाद वगळता अन्य सर्व सेवा बंदच आहेत.

याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या चार दिवसांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले आहे.