करोना मित्रांची यादी झळकणार ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर

महाराष्ट्रातील एका तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतींना अशी यादी लावण्याच्या सूचनाक करण्यात आल्यात

प्रातिनिधिक फोटो (पुण्यातील मंगळवार पेठ येथील कमला नेहरु रुग्णालयामध्ये एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरु झाल्यानंतर कोणत्या मजल्यावर लसीकरण केंद्र आहे हे पाहण्यासाठी पुणेकरांनी नोटीस बोर्डजवळ केलेली गर्दी फोटो सौजन्य: पवन खेंग्रे)

दत्तात्रय भरोदे

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहापूर तालुक्यातील प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना वारंवार देऊनही अनेकजण करोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. करोना आटोक्यात यावा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी करोनाचे नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांची आता ‘सामाजिक आरोग्य शत्रू व करोना मित्र’ म्हणून नोटीस बोर्डावर जाहीर प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई बरोबरच करोनाचे नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांची जाहीर प्रसिद्धी केल्यास करोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होणार आहे. शहापुरचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचित केले असून करोनाचे नियम धाब्यावर बसवणारे तालुक्यातील ग्रामस्थ आता याकडे किती गांभीर्याने घेतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

शहरी भागासह ग्रामीण भागातही करोनाने हातपाय पसरले असून दिवसागणिक करोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे यांसह लग्न कार्यात २५ तर अंत्यविधी साठी २० ग्रामस्थच उपस्थित राहू शकतात असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. त्यानुसार वेळोवेळी करोनाच्या नियमांबाबत जाहीरही करण्यात आले आहे. काही दिवसांपासून करोना रुग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना अनेकजण करोनाला गांभीर्याने घेत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याचे निर्देश देण्यात आले असताना या सूचनांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणी किंवा दुकानात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे सॅनिटायझरचा वापर न करणे या करोनाच्या नियमांचा तालुक्यातील ग्रामस्थांकडून उल्लंघन होत असल्याचे प्रकर्षांने दिसून येत आहे. या कारणांमुळे करोना आटोक्यात येण्या ऐवजी त्याचे संक्रमण वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांची नावे सामाजिक आरोग्य शत्रू व करोना मित्र म्हणून नोटीस बोर्डावर जाहीरपणे प्रसिद्ध करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. त्यादृष्टीने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी कामाला लागले असल्याने लवकरच याचे परिणाम समोर येणार आहेत. दरम्यान करोना रोगापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क, सिनेटायझरचा वापर करावा व शारीरिक अंतर राखून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी केेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus list of people will be display on board who break covid 19 rules scsg

ताज्या बातम्या