राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी असून परळीकरांना या वृत्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.

धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. १२ जून रोजी धनंजय मुंडे व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. धनंजय मुंडे यांनी करोनावर मात केली असून आज सायंकाळी त्यांनाही घरी सोडतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली.