महाराष्ट्र सरकार एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना निर्बंध शिथिलीकरणाबाबत ठोस भाष्य करणे टाळलं होतं. यामुळे निर्बंधांबाबत अनिश्चितता कायम होती. गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या लाल क्षेत्रातील (रेड झोन) निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन : या नियमांचं करावं लागणार पालन

“३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका. आजही ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. ’राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.