राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी १५ मे पर्यंत वाढवला आहे. शिवाय, आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास देखील सुरूवात झाली आहे. मात्र अद्यापही रूग्णसंख्येतील वाढ व रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.

याशिवाय आज ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६३,७५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ६९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर ६७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची ४ लाख २३ हजार ५८७ इतकी संख्या झाली आहे. आजपर्यंत ६ हजार ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल आहे. तर आज ४ हजार ३३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ७३ हजार ८१६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.