जीवघेण्या करोना व्हायरसचा परिणाम चीनच्या बाहेरही दिवसेंदिवस वाढतोय. भारतातही या व्हायरसचे काही संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३९ झाली आहे. यापैकी २३ भारतीय तर १६ परदेशी नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तर डॉक्टरांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा तसेच हस्तांदोलन न करण्याचा सल्ला दिलाय. त्याचा परीणाम सर्वच स्तरावर दिसून येतोय. कोरोना विषाणूबद्दल जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरीक करत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दाखवली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. येथे अजित पवारांनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी हस्तांदोलन करणे टाळले. अजित पवारांनी एकाही व्यक्तीशी हात मिळवला नाही. त्यांनी प्रत्येकाला हात जोडून नमस्कार केला. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘कोरोनामुळे मी हस्तोदंलन टाळत आहे. तुम्हीही अशीच काळजी घ्या. काहींना वाटेल की उपमुख्यमंत्री झालो म्हणून मी असं करतोय, पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. आणि डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करीत आहे.’

तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा, घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा असे ते म्हणताच हास्याचा स्फोट झाला. बारामतीत डॉ. रमेश भोईटे यांनी आयोजित केलेल्या मोफत कर्करोग निदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हा खुलासा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथे अनेक सत्कार पार पडले. अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवारांनी हात जोडून त्यांच्याशी नम्रतेने व हसत हस्तांदोलन टाळले.