पनवेल पालिका परिसरात आतापर्यंत ८८ करोनाबाधित रुग्ण सापडले असून येथील परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी तिस-या टप्यातील १७ मे पर्यंतची टाळेबंदी पनवेलकरांनी काटेकोर पाळण्याचे आवाहन पनवेल पालिका आयुक्तांनी केले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पनवेलची वाटचाल ऑरेंज झोनकडून  रेड झोनकडे होत असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी दिली. आयुक्त देशमुख यांनी वाढत्या करोना संसर्गाबाबत चिंता व्यक्त करत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्याशी चर्चा केली असून दोन्ही प्रशासनांनी  रेड झोनमधील टाळेबंदीप्रमाणे पनवेल परिसरात नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

प्रशासनाच्या या पवित्र्यामुळे नागरिकांनी रायगड जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये असला तरी सोमवारपासून टाळेबंदीचे नियम पनवेल वगळता उर्वरित जिल्ह्यातील टाळेबंदीत शिथिलता मिळणार आहे.  रेड झोनमध्ये पनवेल गेल्यास या परिसरात  ऑरेंज झोनप्रमाणे टाळेबंदीमध्ये शिथिलता येणार नाही. पनवेल पालिका परिसराची लोकसंख्या आठ लाखांवर असून आतापर्यंत १०१० रुग्णांची करोनाची चाचणी झाली आहे. ६४ चाचण्यांचे अहवाल अद्याप पालिकेला मिळाले नसून  ३२ रुग्ण बरे झाले आहेत.