रत्नागिरी : रत्नागिरीत या रोगाची लागण झाल्याच्या संशयावरून एका रुग्णाला येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मात्र या रुग्णाला सर्वसाधारण लक्षणे दिसून आली आहेत. केवळ खबरदारी म्हणून जास्त काळजी घेतली जात असून करोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

न्यायालयीन कामानिमित्त संबंधित रुग्ण दिल्लीला गेले होते. त्यात त्यांचा प्रवास गर्दीतून झाला आहे. तिकडून आल्यानंतर त्यांना खोकला, सर्दी, दमा, ताप अशी लक्षणे आढळली. येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेण्यासाठी गेले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णालयातील स्वतंत्र खोलीमध्ये त्यांना ठेवले आहे.

त्यांच्या थुंकीचे व इतर नमुने तपासणीसाठी शनिवारी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली.