औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने निवडणुकीचे प्रमुख म्हणून आमदार अतुल सावे यांची निवड केली आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची निवडणूक सहप्रमुख व डॉ. भागवत कराड यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. या त्रिसदस्यीय समितीकडे मनपा निवडणुकीचे अधिकार दिले आहेत. उद्यापासून (शनिवार) कामाला लागणार असून युतीबाबतही लवकरच चर्चा करण्यात येईल, असे आमदार सावे यांनी सांगितले.शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उद्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. प्रदीप जैस्वाल यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने शहरात तगडे उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबईत बैठक घेऊन जाहीर केले आहे. उमेदवारी अर्जही कार्यालयात उपलब्ध होतील असे कळविण्यात आले आहे. मात्र, शुक्रवापर्यंत ते पोहोचले नव्हते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विश्वजित कदम व आरिफ नसीम खान हे दोघे निवडणुकीबाबतचे निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे.कोणत्या वॉर्डात कोणती व्यक्ती जिंकून येऊ शकते याचे आडाखे मांडले जात आहेत. आरक्षण आणि जात-धर्म अशी लोकसंख्येची गणिते घातली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सामसुमच असल्यासारखे वातावरण आहे. आघाडी होणार का, असा प्रश्नही विचारला जात नाही. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये अजून काही ठरले नाही. भाजप-सेनेने तयारी सुरूकेली असली, तरी युती होणार का, यावर दोन्ही बाजूने चर्चा करून ठरवू, असे उत्तर येत आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने समिती नियुक्त केली असून कार्यालयप्रमुख मनोज पांगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवडणूक शहर विकासाच्या मुद्दय़ावर न होता जाती-धर्माच्या आधारावरच लढविली जावी, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आचारसंहिता जारी झाल्यानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग येईल.