कोल्हापूर महापालिकेमध्ये शोकसभेवरून राजकारण रंगत असताना बुधवारी सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कुरघोडय़ा होत राहिल्या. महापौरांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचे नाही असे धोरण काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतले असताना एकाकी पडलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी काँग्रेसच्या दोन व भाजप-शिवसेनाच्या सात नगरसेवकांना घेऊन सभा घेण्याचा प्रयत्न केला. गणपूर्तीअभावी सभा तहकूब करावी लागली. सभेनंतर बोलताना माळवी यांनी महापौरपदाचा राजानामा देणार नाही याचा पुनरुच्चार केला. शुक्रवारी सभा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांचा राजीनामा मागणारे भाजप-शिवसेनेचे नगरसेवक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा निषेध नोंदविला.
कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. कॉ. गोिवद पानसरे यांच्यावर या दिवशी गोळीबार झाला होता. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली होती. ही सभा आज आयोजित केली होती. या सभेला शह देण्यासाठी सत्तारूढ गटाकडून शोकसभेचे आयोजन केले होते. शोकसभा स्थायी समितीच्या सभागृहात सुरू राहिली. शोकसभेला बोलावणे न आल्याने महापौर माळवी यांनी राजर्षी शाहू सभागृहात मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीत शोकसभा घेतली. त्यानंतर तेथेच सर्वसाधारण सभेचे काम त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले.
या सभेला काँग्रेसचे सतीश घोरपडे, किरण शिरोळे, भाजपचे आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, पल्लवी देसाई, शिवसेनेचे संभाजी जाधव, राजीव हुंबे, अरुणा टिपुगडे आदी सदस्य उपस्थित हेते. ९ सदस्यांच्या उपस्थितीमुळे सभेसाठी आवश्यक असलेली गणपूर्ती होऊ शकली नाही. यामुळे महापौरांनी सभा तहकूब केल्याची जाहीर केले.
सभा संपवून माळवी महापौर दालनात परतल्या. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणाकडून अन् कितीही दबाव आला तरी महापौरपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांच्या बहिष्काराच्या चालीला उत्तर देण्यासाठी महापौरांनी प्रतिचाल खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शुक्रवारी सभेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात तीन सभा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. सलग तीन सभांना अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होते. याचे भान बहिष्कार टाकणाऱ्या नगरसेवकांनी ठेवावे. दुसऱ्याला अडचणीत आणताना आपण कोंडीत सापडू हा भ्रम त्यांनी दूर करावा असेही त्या म्हणाल्या. शहकाटशहाचे राजकारण करण्यासाठी महापालिकेतील कायदेशीर गोष्टींचा अभ्यास सुरू केला आहे. आपण एकाकी असून, प्रभागातील नगरसेवकांच्या पाठबळावर लढा देण्यास समर्थ असल्याचे माळवी यांनी सांगितले.
दरम्यान, सत्तारूढ गटाचे राजेश लाटकर आदिल फरास, सचिन चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-सेनेच्या नगरसेवकांवर टीका केली. एकीकडे भ्रष्ट महापौर हटवण्यासाठी भाजप-सेनेकडून आंदोलने केली जात आहेत, शुद्धीकरणाचा होमहवन घातला जात आहे. अन् दुसरीकडे महापौरांच्या उपस्थितीतील सभेला हेच नगरसेवक हजेरी लावत आहेत. भाजप-सेनेच्या नगरसेवकांची दुटप्पी खेळी सुरू असून त्याचा निषेध नोंदवत असल्याचे त्यांनी सांगितले. सलग तीन सभा घेऊन अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा पवित्रा महापौरांनी घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर लाटकर यांनी या बाबीचा आम्हीही अभ्यास केला असल्याने नगरसेवकांवर कसलीही कारवाई होणार नाही, असा विश्वास व्यक्त करून महापौरांना उत्तर देण्यास समर्थ असल्याचे त्यांनी नमूद केले.