माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी देण्याचे मुलांना आदेश

मुले आईपासून विभक्त असून एका मुलीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह आपल्या आईकडे राहते.

सोलापूर : जिथे फुले, तिथेच गोवऱ्या वेचण्याची परिस्थिती उद्भवलेल्या दिवंगत माजी उपमहापौर तथा यंत्रमाग कारखानदाराच्या वृद्ध विधवा पत्नीला दैनंदिन उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोन्ही मुलांनी पोटगी देण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांनी दिला आहे.

सरोजिनीबाई नारायणराव पिठ्ठा (वय ६८, रा. अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) यांनी पोटगी मिळण्यासाठी आपली दोन्ही मुले श्रीनिवास आणि भास्कर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊ न ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियम २००७ मधील तरतुदींच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी निकम यांनी सरोजिनीबाईंच्या बाजूने निकाल दिला.

त्यानुसार दोन्ही मुलांना दरमहा चार हजार रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. याशिवाय दिवंगत नारायणराव पिठ्ठा यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या मालकीच्या ४४ यंत्रमागांपैकी आठ यंत्रमागांचे भाडेही सरोजिनीबाईंना त्यांच्या मुलांनी द्यावयाचे आहे.

एके काळी शहराच्या पूर्वभागात विविध सहकारी संस्थांवर प्रतिनिधित्व केलेले यंत्रमाग कारखानदार तथा माजी उपमहापौर नारायणराव पिठ्ठा यांचे २५ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले होते. त्यांना पत्नीसह तीन मुली व दोन मुले आहे. मुले-मुली विवाहित आहेत.

मुले आईपासून विभक्त असून एका मुलीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह आपल्या आईकडे राहते. दोन्ही मुले सांभाळ करीत नसल्यामुळे आई सरोजिनीबाई यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियमाचा आधार घेऊ न दोन्ही मुलांकडून पोटगी मिळण्यासाठी २०१९ साली उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती.

त्यावर सुनावणी होऊ न दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. दोन्ही मुलांनी आपल्या आईची आर्थिक परिस्थिती पोटगी द्यावी एवढी नाजूक नसल्याचे म्हणणे मांडले होते. परंतु ते फेटाळण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Court order former deputy mayor sons to pay alimony to widow zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या