अहिल्यानगर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात अधिक तपास करून ९ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने कोतवाली पोलिसांना दिले आहेत. कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याचा अहवाल दिला होता. मात्र, या गुन्ह्यात अपूर्ण व सदोष तपास झाल्याचा आक्षेप फिर्यादी डॉ. सतीश राजूरकर यांनी घेत अधिक तपासाची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केल्याचे ॲड. अभिजीत पुप्पाल यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील अपहार प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना गुन्ह्यात डॉ. बोरगे यांचा सहभाग आढळून आला नाही. डॉ. बोरगे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा नाही, असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. तो न्यायालयाने अमान्य करत ‘प्रोसेस इश्यू’ करण्याचे आदेश दिले होते. त्यावर डॉ. बोरगे यांनी अपील केल्यानंतर प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी तो आदेश रद्द केला होता.

त्यानंतर फिर्यादीच्या वतीने पुन्हा न्यायालयात अधिक तपासाच्या मागणीचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी झाली. “डिजिटल की” संबंधित पुरावे, कॅश बुक, आवश्यक रजिस्टर, गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे तपासात घेण्यात आलेली नाहीत, तपास अपूर्ण व चुकीचा असल्याचा युक्तिवाद ॲड. अभिजीत पुप्पाल यांनी केला व अधिक तपासाची मागणी केली. कोतवाली पोलिसांकडूनही अहवाल सादर करण्यात आला. डॉ. बोरगे यांच्यावतीनेही युक्तिवाद होऊन प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाकडे लक्ष वेधत अधिक तपासाच्या अर्जाला विरोध करण्यात आला. न्यायालयाने मात्र फिर्यादी राजूरकर यांचा अर्ज मंजूर करून घेत कोतवाली पोलिसांना अधिक तपास करण्याचे व ९ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.